शासनाएवढीच वैयक्तिक मदत नुकसानग्रस्तांसाठी देणार.

औसा (प्रतिनिधी) – बेधडक आवाज
मराठवाड्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी, मजूर, पशुपालक, तसेच सर्वसामान्य जनतेवर नैसर्गिक आपत्तीचे जबरदस्त संकट कोसळले. शेतातील उभ्या पिकांचे नुकसान, जमीन वाहून जाणे, घरांची पडझड, जनावरांचे मृत्यू, आणि मनुष्यहानी अशा विविध प्रकारच्या नुकसानीने शेतकरी हतबल झाले आहेत.
या भीषण परिस्थितीत औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी माणुसकीच्या भावनेतून शासनाच्या मदतीसोबत स्वतःकडूनही मदतीचा हात पुढे केला आहे. शासन जितकी मदत देत आहे तितकीच क्रीएटीव्ह फाऊंडेशन आणि अभय भुतडा फाऊंडेशन यांच्या माध्यमातून नुकसानग्रस्तांना मदत देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.
शासनाकडून मिळालेल्या पंचनाम्यांच्या आधारे पात्र नुकसानग्रस्तांना ही मदत दिली जाणार असून, दिवाळीपूर्वी औसा येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात कृषिरत्न व कृषी उद्योजक श्री. बी. बी. ठोंबरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश आणि अन्नधान्य पॅकेट्स वाटप केले जाणार आहे.
आमदार पवार यांनी स्पष्ट केले की,
> “ज्या शेतकऱ्यांचा बैल वाहून गेला आहे त्यांना शासनाकडून ३२ हजार तर गाय/म्हैस वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना ३७,५०० रुपये मदत मिळते. मात्र सध्याच्या बाजारभावानुसार ७०-८० हजारांच्या आत नवीन जनावर मिळत नाही. म्हणूनच शासनाएवढीच मदत मी वैयक्तिकरित्या देण्याचा निर्णय घेतला आहे.”
त्यांनी पुढे नुकसानग्रस्तांना आवाहन केले की
> “ही मदत इतरत्र खर्च न करता ज्या कारणासाठी मिळाली आहे त्याच कारणासाठी वापरावी. म्हणजे बैल दगावला असेल तर बैलच घ्यावा, गाय/म्हैस दगावली असेल तर तीच घ्यावी. ही माणुसकीच्या विचारातून दिलेली मदत आहे.”
औसा विधानसभा प्रशासनाकडून पात्र कुटुंबांना पुढील कार्यवाहीसाठी लवकरच कळविण्यात येईल.
“विचार माणुसकीचा, एक हात मदतीचा” या भावनेने औसाच्या जनतेला दिलासा देणारे हे पाऊल औसा परिसरात आणि मराठवाडाभरात चर्चेचा विषय ठरत आहे.




