जिल्हा रुग्णालयाच्या कामासाठी ठाम भूमिका, आंदोलनाचा इशारा.


लातूर | प्रतिनिधी | 10 जुलै 2025लातूर जिल्हा रुग्णालयाच्या कामावर स्थगिती आणणाऱ्या राज्य शासनाच्या परिपत्रकाविरोधात आज लातूर शहरात काँग्रेसकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परिपत्रकाची होळी करत शासनाच्या धोरणांचा खरपूस समाचार घेण्यात आला. यावेळी काँग्रेसने स्पष्ट इशारा दिला की, जर लवकरच हे परिपत्रक मागे घेण्यात आले नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.राज्याचे माजी मंत्री आणि लातूरचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी नुकतीच आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन जिल्हा रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर कृषी विद्यापीठाला जागेचा निधी वर्ग करून जिल्हा रुग्णालयासाठी जमीन हस्तांतरित करण्यात आली. इतके करूनही रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात झाली नव्हती. त्यातच २५ मे रोजी आरोग्य विभागाने नवीन परिपत्रक जाहीर करत, नव्या आरोग्य प्रकल्पांना मंजुरी न देण्याचा आदेश दिला. परिणामी लातूरमधील जिल्हा रुग्णालयाचे स्वप्न पुन्हा अधांतरी राहण्याची भीती निर्माण झाली.या पार्श्वभूमीवर “माझं लातूर” सामाजिक संघटनेसह काँग्रेसने पुढाकार घेत लातूरच्या जनतेचा आवाज बुलंद केला. जिल्हा प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात काँग्रेसने स्पष्ट केले की, लातूरकरांसाठी जिल्हा रुग्णालय अत्यावश्यक आहे आणि शासनाच्या या परिपत्रकामुळे जनतेच्या आरोग्याचा प्रश्न धोक्यात आला आहे. तात्काळ हे आदेश मागे घेऊन रुग्णालयाच्या बांधकामाला गती द्यावी, अन्यथा काँग्रेस तीव्र आंदोलनाच्या मार्गावर जाईल, असा इशारा देण्यात आला.निषेध आंदोलनात शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, माजी उपमहापौर कैलास कांबळे, डॉ. बालाजी सोळुंके, सुपर्ण जगताप, इम्रान सय्यद, प्रा. प्रवीण कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, आसिफ बागवान, गोरोबा लोखंडे, आयुब मणियार, पप्पू देशमुख, विजय गायकवाड आदींसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.या आंदोलनामुळे लातूर जिल्ह्यातील जनतेच्या दीर्घकालीन मागणीस पुन्हा एकदा गती मिळण्याची शक्यता असून, शासनाने लवकरात लवकर निर्णय घेतला नाही, तर लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे राहण्याचे चित्र आहे.