आरोग्यक्राइमदेशप्रशासनमहाराष्ट्रराजकारण

अनुष्का पाटोळे प्रकरणात जरांगे पाटील मैदानात : लातूर प्रशासनाला थेट इशारा,,

लातूर | प्रतिनिधी (बेधडक आवाज)

लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात सहावीच्या वर्गात शिकणारी निरागस विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे हिच्या मृत्यूचे प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर व संतापजनक होत चालले आहे. या प्रकरणाला न्याय मिळवून देण्यासाठी आज बीड जिल्ह्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट घेत संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती दिली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येताच जरांगे पाटील यांनी कोणतीही चालढकल न करता तात्काळ हालचाली सुरू केल्या. त्यांनी लातूर जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवरून जवळपास १५ मिनिटे सखोल चर्चा करून प्रकरणाची माहिती घेतली. तसेच मुख्यमंत्री कार्यालयातील SDO यांना तात्काळ फोन करून हे प्रकरण मी स्वतः हाताळणार असल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले.

> “या प्रकरणात कोणत्याही अधिकाऱ्याचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही,”

असा ठणकावून इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

याचवेळी त्यांनी अनुष्काच्या पीडित आई-वडिलांशी फोनवरून संवाद साधत सांत्वन केले. त्यांच्या दु:खात आम्ही सोबत आहोत, न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही, असा विश्वासही त्यांनी दिला.

आंदोलक म्हणून ओळख असलेल्या जरांगे पाटील यांचा प्रशासनावर असलेला दबाव सर्वश्रुत आहे. त्यामुळेच या प्रकरणाला योग्य दिशा मिळावी, तपासाला गती यावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, या उद्देशानेच बीडमधील पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतल्याचे स्पष्ट होत आहे. या संदर्भात पुढील दोन दिवसांत पुन्हा बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हे प्रकरण दडपले जाऊ नये, थंडावू नये, यासाठी समाजाने जागे राहणे अत्यंत गरजेचे आहे. अत्यंत धाडसी, हुशार आणि निरागस असलेल्या एका चिमुकलीचा बळी गेला आहे. अनुष्का परत येणार नाही, हे कटू सत्य असले तरी तिच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होऊन आई-वडिलांना न्याय मिळायलाच हवा, हीच संपूर्ण समाजाची मागणी आहे.

प्रशासनाने आता संवेदनशीलतेने नव्हे तर कर्तव्यभावनेने आणि कठोरतेने पावले उचलावीत, अन्यथा हा आक्रोश रस्त्यावर उतरेल, असा इशाराच या हालचालीतून मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button