महापौरांचा निर्णय शहराचा चेहरा बदलणार?

लातूर | 17/04/2026लातूर महानगरपालिकेच्या सत्तेच्या दालनात सध्या एक वेगळीच हालचाल सुरू आहे. महापौर जयश्री सोनकांबळे यांनी काही दिवसांपूर्वी झोननिहाय अतिक्रमण आणि अवैध बांधकामांची यादी मागवली आणि शहरातील राजकीय-प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली. कागदावरच्या या हालचालीने अनेकांच्या भुवया उंचावल्या, तर सामान्य नागरिकांच्या मनात एकच प्रश्न डोकावू लागला जे काम वर्षानुवर्षे प्रलंबित राहिले, जे आधीच्या महापौरांना आणि अधिकाऱ्यांना जमले नाही, ते आता खरंच घडणार आहे का?लातूर शहराचा चेहरा गेल्या काही वर्षांत झपाट्याने बदलला, पण या बदलाच्या आड एक कुरूप वास्तवही वाढत गेलं अतिक्रमण, अवैध बांधकामं आणि नियमांना पायदळी तुडवत उभ्या राहिलेल्या टोलेजंग इमारती. शहरातील अनेक भागांत मंगल कार्यालयांच्या नावाखाली उभे असलेले भव्य बांधकामे केवळ सोहळ्यांसाठीच नव्हे, तर वाहतुकीच्या कोंडीचे कायमस्वरूपी कारण बनले आहेत. परवानग्या एका गोष्टीसाठी, वापर मात्र दुसऱ्याच गोष्टीसाठी ही नवी पद्धत आता इतकी सामान्य झाली आहे की नियम हा अपवाद आणि उल्लंघन हा नियम बनल्याचं चित्र आहे.पार्किंगसाठी राखीव असलेली जागा व्यापारी वापरासाठी खुली करून टाकण्याची स्पर्धाच लागल्यासारखी आहे. जिथे वाहन उभं राहायला हवं, तिथे हॉटेल्स, दुकाने, गोदामं सुरू आहेत. परिणामी, नागरिकांना त्यांच्या वाहनांसाठी रस्त्याचाच आधार घ्यावा लागतो आणि शहरातील रस्ते पार्किंग झोनमध्ये रूपांतरित होतात. वाहतूक कोंडी ही समस्या नसून दैनंदिन वास्तव बनली आहे. या सगळ्या गोंधळात सर्वसामान्य माणूसच भरडला जातो तो ना नियम मोडतो, ना फायदा घेतो, पण शिक्षा मात्र त्यालाच भोगावी लागते.प्रश्न असा आहे की हे सगळं अचानक घडलं का? नक्कीच नाही. या प्रत्येक अनधिकृत बांधकामामागे कुणाचातरी आशीर्वाद, कुणाचातरी मौन आणि कुणाचातरी स्वार्थ दडलेला आहे. प्रशासनाच्या नजरेआड इतक्या मोठ्या प्रमाणात उल्लंघन होणं शक्यच नाही. मग आजपर्यंत कारवाई का झाली नाही? हा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे. कागदोपत्री नोटिसा, अर्धवट कारवाया आणि राजकीय दबावाखाली थांबलेली मोहीम हेच आजवरचं वास्तव राहिलं आहे.अशा पार्श्वभूमीवर महापौर जयश्री सोनकांबळे यांची हालचाल वेगळी वाटते, पण ती केवळ कागदावरच मर्यादित राहणार की प्रत्यक्ष कृतीत उतरणार, हेच खरे कसोटीचे क्षण ठरणार आहेत. याद्या मागवणे ही सुरुवात असू शकते, पण इतिहास घडवण्यासाठी ती पुरेशी नाही. त्या याद्यांवर पुढे काय होतं हेच महत्त्वाचं. कारण लातूरकरांनी याआधीही अनेक घोषणा ऐकल्या आहेत, अनेक मोहिमा सुरू होताना पाहिल्या आहेत आणि तितक्याच शांतपणे संपताना देखील अनुभवल्या आहेत.आज शहरातील नागरिकांमध्ये एक वेगळीच चर्चा रंगताना दिसते. काहींना आशा आहे की यावेळी काहीतरी वेगळं घडेल, तर काही जण या सगळ्याकडे नेहमीसारख्याच संशयाने पाहत आहेत. “याद्या मागवून काय होणार?” हा प्रश्न रस्त्यावरच्या चहाच्या टपरीपासून ते व्यापारी गल्लीपर्यंत ऐकू येतो. कारण लोकांनी केवळ शब्द नव्हे, तर कृतीची अपेक्षा ठेवायला सुरुवात केली आहे.महापौर पदावर बसल्यानंतर केवळ निर्णय घेणे पुरेसे नसते, तर ते अंमलात आणण्याची हिंमतही लागते. अतिक्रमणाविरोधात कारवाई म्हणजे केवळ बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर चालवणे नाही, तर त्या मागे उभ्या असलेल्या सत्ताधाऱ्यांनाही आव्हान देणे असते. आणि इथेच खरी परीक्षा सुरू होते. कारण शहरात उभ्या असलेल्या अनेक अवैध इमारती या केवळ विटा-मातीच्या नसून, त्या सत्तेच्या छायेखाली वाढलेल्या आहेत.जर या याद्यांवरून खरोखरच कडक कारवाई झाली, तर लातूरच्या इतिहासात हा एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो. शहराला शिस्त लावण्याचा हा प्रयत्न असेल, तर त्याचे स्वागतच होईल. पण जर हेही केवळ कागदी घोडे ठरले, तर नागरिकांचा उरलेला विश्वासही ढासळण्याची शक्यता आहे.आज गरज आहे ती स्पष्ट भूमिकेची. अतिक्रमण कोणाचेही असो लहान व्यापाऱ्याचे की मोठ्या बिल्डरचे नियम एकसमान असले पाहिजेत. अन्यथा ही मोहीम केवळ निवडकांवर कारवाई आणि निवडकांना मोकळीक देण्याचा आरोप सहन करेल. आणि एकदा असा आरोप ठोस झाला, तर कोणतीही कारवाई विश्वासार्ह राहत नाही.लातूर शहर आज एका वळणावर उभं आहे. एका बाजूला अव्यवस्था, अतिक्रमण आणि नियमभंग यांचा पसारा आहे, तर दुसऱ्या बाजूला शिस्त, नियोजन आणि जबाबदारीची अपेक्षा आहे. महापौर जयश्री सोनकांबळे यांच्याकडे या दोन्ही मार्गांपैकी एक निवडण्याची संधी आहे. याद्या मागवून त्यांनी पहिलं पाऊल टाकलं आहे, पण पुढची पावलं किती ठाम असतील, यावरच त्यांचा कार्यकाळ ओळखला जाईल.शहरातील नागरिक आता केवळ घोषणांनी प्रभावित होत नाहीत. त्यांना परिणाम हवा आहे, बदल हवा आहे. आणि हा बदल घडवण्यासाठी सत्तेचा वापर कसा केला जातो, हेच महत्त्वाचं ठरणार आहे. लातूरकरांच्या मनात सध्या एकच प्रश्न घुमतोय ही मोहीम खरोखर इतिहास घडवणार की आणखी एक अपूर्ण कथा बनून राहणार?




