पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ लातुरात शिवसेनेचे तीव्र आंदोलन; पाकिस्तानविरोधात संतापाचा उद्रेक

बेधडक आवाज [ लातूर ]-
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे पाकधार्जिण्या दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ लातूर शहरात शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. गंजगोलाई परिसरात शिवसैनिकांनी घोषणा देत निषेध फेरी काढली. “पाकिस्तान मुर्दाबाद”, “पाकिस्तान जला दो” अशा घोषणा देत संपूर्ण गोलाई परिसर दणाणून सोडण्यात आला.
या वेळी उपस्थित शिवसैनिकांनी काळ्या फिती लावून हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून त्यांच्या आठवणीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
शिवसेना लातूर जिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की, “हा हल्ला फक्त काही लोकांवर नाही, तर संपूर्ण भारतावर आहे. प्रत्येक मृत पावलेल्या कुटुंबाच्या दु:खात शिवसेना सहभागी आहे. भारतीय सेनेने या भ्याड कृत्याचा बदला घेतला पाहिजे.”
या आंदोलनात युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि लातूरकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देशभरात या घटनेविरोधात संतापाची लाट उसळली असून, लातुरातील हे आंदोलन त्याचाच एक भाग ठरले आहे.