हा आत्महत्येचा प्रकार की प्रशासनाच्या दुर्लक्षाचा बळी?

Latur | {बेधडक आवाज} लातूरच्या नवोदय विद्यालयात घडलेली अनुष्का पाटोळे हिची दुर्दैवी घटना ही केवळ एका कुटुंबाच्या काळजावर घाव घालणारी नाही, तर संपूर्ण व्यवस्थेच्या तोंडावर मारलेला चपराक आहे. अवघ्या बारा वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा वसतिगृहात गळफास लागलेल्या अवस्थेत मृत्यू होतो आणि सगळा जिल्हा हादरतो. पण याच वेळी एक प्रश्न अधिक बोचरा होतो.महानगरपालिका निवडणुकीची तयारी करणारे उमेदवार नेमके कुठे आहेत?आज लातूर शहरात निवडणुकीची चाहूल लागताच बॅनर, फलक, शुभेच्छा, वाढदिवस, उद्घाटनांची गर्दी वाढली आहे. “जनतेसाठी लढणारा”, “शिक्षणप्रिय नेता”, “भविष्यासाठी कटिबद्ध” अशी विशेषणे स्वतःच्या नावापुढे लावून प्रचार सुरू झाला आहे. पण अनुष्कासारख्या मुलीच्या मृत्यूने जे प्रश्न उभे राहिले, त्यावर या सगळ्यांचा आवाज अचानक हरवतो, हीच खरी शोकांतिका आहे.
जर तुम्ही खरोखरच जनता हितासाठी निवडणूक लढवणार असाल, तर अशा घटनांवर तुमची भूमिका स्पष्ट का नाही?
वसतिगृहात इतक्या लहान वयाच्या विद्यार्थिनीवर देखरेख का नव्हती, मानसिक तणाव ओळखण्याची यंत्रणा का अपयशी ठरली, जबाबदार कोण हे प्रश्न फक्त नातेवाईकांनीच विचारायचे का? की सत्ता मिळाल्यानंतरच संवेदनशीलता जागी होते?
अनुष्काच्या मृत्यूनंतर संतप्त पालक, अश्रू ढाळणारे आई-वडील आणि हादरलेला समाज दिसतो. मात्र त्याच वेळी राजकीय इच्छुकांचा मौन अधिक घातक वाटतो. कारण हे मौन म्हणजेच उद्याच्या प्रशासनाची मानसिकता असते. आज जर आवाज नाही, तर उद्या अधिकार मिळाल्यावरही “चौकशी सुरू आहे” एवढ्यावरच गोष्ट थांबणार, हे सांगायला कोण ज्योतिष लागत नाही.
महानगरपालिका निवडणूक म्हणजे फक्त ड्रेनेज, रस्ते आणि दिवे एवढाच विषय नाही. शहरात राहणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही याच लोकप्रतिनिधींवर असते. शाळा, वसतिगृहे, खासगी शिक्षणसंस्था यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी नगरपालिकेची भूमिका महत्त्वाची असते. पण हे मुद्दे प्रचारात नसतात, कारण ते बॅनरवर शोभून दिसत नाहीत.
आज वेळ आहे.प्रचाराच्या घोषणांऐवजी कृतीतून जनता हित दाखवण्याची.
अनुष्का प्रकरणी सखोल चौकशीची मागणी करा, दोषींवर कारवाईसाठी प्रशासनावर दबाव आणा, शहरातील सर्व शाळा-वसतिगृहांच्या सुरक्षिततेचा आढावा घ्या, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी ठोस धोरण मांडून दाखवा. हे केलंत तरच जनता तुमच्या पोस्टरवर विश्वास ठेवेल.
अन्यथा निवडणूक जिंकली तरी प्रश्न कायम राहील
अनुष्काच्या वेळी तुम्ही कुठे होतात?
कारण जनता आता फक्त भाषण ऐकत नाही, ती भूमिका पाहते.आणि लक्षात ठेवाप्रचार किती झाला यावर नव्हे, तर अशा काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनांवर तुम्ही काय केलं, यावरच तुमची खरी राजकीय उंची ठरणार आहे.




