काँग्रेससाठी धोक्याची घंटा की सत्तेची नांदी?

Latur |(बेधडक आवाज) लातूर काँग्रेसच्या राजकारणात सध्या जे काही घडत आहे, ते केवळ योगायोग म्हणता येणार नाही. एकीकडे काँग्रेसमधील जुने, अनुभवी आणि पक्के राजकारणी पक्ष सोडून जात असल्याचे चित्र दिसत असताना, दुसरीकडे बाभळगाव येथील काँग्रेसचे आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या गडीवर उमेदवारीसाठी इच्छुक आणि काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांची झुंडच्या झुंड गर्दी करत आहेत. ही दोन टोकांची दृश्ये पाहिली की स्वाभाविकपणे प्रश्न निर्माण होतो की ही काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे की यामागे अमित देशमुखांचा एखादा मोठा आणि शांत मास्टर प्लॅन कार्यरत आहे.
काँग्रेससाठी अनेक वर्षे काम केलेले, निवडणुका लढवलेले आणि पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळलेले काही चेहरे आज अस्वस्थ दिसत आहेत. आपल्याला डावलले जात आहे, निर्णय प्रक्रियेत स्थान नाही, नवीन लोकांना जास्त महत्त्व दिले जात आहे, अशी नाराजी आता केवळ बंद दाराआड राहिलेली नाही, तर थेट पक्षांतराच्या रूपाने बाहेर येत आहे. मात्र हा प्रवास एकतर्फी आहे का, की काँग्रेसच अशा नेत्यांपासून स्वतःला हळूहळू दूर करत आहे, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा ठरतो. कारण राजकारणात कोणतीही हालचाल विनाकारण होत नसते.
याच काळात बाभळगाव आणि त्याच्या आसपासचा परिसर वेगळेच चित्र दाखवतो आहे. महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची गर्दी अमित देशमुखांच्या दरवाज्यावर वाढत चालली आहे. केवळ पदाच्या अपेक्षेने नव्हे, तर त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासामुळे ही गर्दी होत असल्याची चर्चा आहे. आज लातूरमध्ये काँग्रेसची ताकद एखाद्या व्यक्तीकेंद्रित झाली असल्याचे वास्तव नाकारता येत नाही आणि त्या केंद्रबिंदूचे नाव अमित विलासराव देशमुख आहे.
म्हणूनच काही राजकीय जाणकार ही स्थिती धोक्याची न मानता नियोजित पुनर्रचनेचा भाग असल्याचे सांगतात. जुने, असंतुष्ट आणि मतदारांशी तुटलेले चेहरे बाहेर पडू देणे, त्याच वेळी तरुण, सक्रिय आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेले नवे चेहरे पुढे आणणे, हा सगळा पट जर एकत्र पाहिला तर तो एका मास्टर प्लॅनकडे निर्देश करतो. हा प्लॅन यशस्वी ठरला तर लातूर महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो.
तरीही धोका पूर्णतः नाकारता येत नाही. बाहेर गेलेले नेते विरोधकांच्या हाती ताकद देऊ शकतात, अंतर्गत नाराजी वाढू शकते आणि पक्षातील संवाद तुटल्यास त्याचा फटका निवडणुकांमध्ये बसू शकतो. पण हे सगळे जर एका ठरावीक नियंत्रणात घडत असेल, तर आज दिसणारी गोंधळाची परिस्थिती उद्या काँग्रेससाठी संधी ठरू शकते.
आज लातूर काँग्रेससमोरचा खरा प्रश्न हा नाही की कोण गेला आणि कोण आला, तर प्रश्न हा आहे की या सगळ्या हालचालींचा सूत्रधार कोण आहे. आणि जर या सगळ्यामागे अमित विलासराव देशमुखांची रणनीती असेल, तर सध्या दिसणारी ही अस्वस्थता काँग्रेससाठी धोक्याची घंटा न ठरता, महापालिकेवर सत्ता मिळवण्याची नांदी ठरू शकते.




