रिंग रोड, भुयारी मार्ग, उड्डाणपूल मंजुरीकडे!

नागपूर / लातूर :
लातूरकरांना वाहतूक कोंडीपासून दिलासा देणारी आणि शहराच्या विकासाला गती देणारी खरी दीपावली भेट मिळाली आहे. औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन लातूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या कामांचा पाठपुरावा केला. या भेटीत चार मोठे विषय मार्गी लागल्याची माहिती मिळाली आहे.
यामध्ये लातूर शहराबाहेरून जाणाऱ्या सुमारे ६० किलोमीटर लांबीच्या पर्यायी रिंग रोडला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण करण्यास तत्त्वतः सहमती मिळाली आहे.
‘पेठ – चांडेश्वर – कव्हा – बाभळगाव – भातखेडा – खुलगापूर – नांदगाव – रायवाडी – हरंगुळ – खंडापूर – गंगापूर – पेठ’ असा हा रिंग रोड सध्या राज्य मार्ग म्हणून मंजूर असून, ४८ किलोमीटरचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित १२ किलोमीटरसाठी गडकरींनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांच्याशी थेट संपर्क साधून भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
राज्य सरकारकडून प्रस्ताव प्राप्त होताच रिंग रोडला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण करण्याची

मंजुरी देण्यात येईल, असा शब्द नितीन गडकरी यांनी दिला आहे. या निर्णयामुळे लातूर शहरातील वाढती वाहतूककोंडी कमी होऊन, शहराचा विस्तार नियोजितपणे साधता येईल.
तसेच ‘आशिव – मातोळा – किल्लारी – जेवरी – नणंद’ या मार्गावरील वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर आशिव पाटी येथे भुयारी मार्ग (व्हेईकल अंडरपास) बांधण्याच्या प्रस्तावालाही केंद्रीय मंत्र्यांनी लेखी मंजुरी दिली आहे.
दरम्यान, तेरणा नदीवरील उजनी उड्डाणपूलाच्या पुनर्बांधणी व मोठ्या नालीच्या बांधकामाला पुढील १५ दिवसांत सुरुवात करण्याचे आदेश गडकरींनी अधिकाऱ्यांना फोनवरून दिले आहेत.
लातूर–औसा–तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील औसा शहरातील उड्डाणपूलाच्या डीपीआरसाठी कन्सल्टंट नेमण्याची प्रक्रिया सुरू असून, ३० ऑक्टोबर २०२५ ही निविदेची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. अंदाजपत्रक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून पुढील नऊ महिन्यांत काम प्रत्यक्ष सुरू करण्याचे आश्वासन गडकरींनी दिले.
या सर्व प्रकल्पांमुळे लातूर शहर व औसा मतदारसंघाच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, वाहतुकीची सुलभता, ग्रामीण संपर्क आणि औद्योगिक क्षेत्राचा विकास साधला जाईल, असा विश्वास आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला.
ही फक्त दीपावली भेट नाही, तर लातूरकरांसाठी विकासाची हमी आहे. प्रत्येक काम प्रत्यक्षात पूर्ण होईपर्यंत माझा पाठपुरावा सुरू राहील,
असे आमदार पवार यांनी स्पष्ट केले.




