
लातूर| बेधडक आवाजशहरातील नाईक चौक ते राजीव गांधी चौक या राष्ट्रीय महामार्गावर वाहनातून सांडलेली वाळू वाहनधारकांसाठी जीवघेणी ठरत असताना, प्रभाग क्रमांक १७ चे नूतन नगरसेवक अनंत गायकवाड यांच्या संवेदनशीलता व तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.सदर मार्गावरून जाणाऱ्या वाहनातून मोठ्या प्रमाणात वाळू रस्त्यावर पडली होती. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे नियंत्रण सुटून अनेक वाहनधारक घसरले. काही जण किरकोळ जखमीही झाले. अशा प्रसंगी बहुतांश वेळा नागरिक बघ्याची भूमिका घेतात. मात्र, ही बाब नगरसेवक अनंत गायकवाड यांच्या निदर्शनास येताच त्यांनी विलंब न करता तातडीची पावले उचलली.घटनेची माहिती मिळताच नगरसेवक गायकवाड यांनी त्वरित महापालिकेच्या संबंधित विभागाशी संपर्क साधून कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले. महामार्गावर पडलेली वाळू तात्काळ उचलून रस्ता सुरक्षित करण्यात आला. ही घटना दिसायला छोटी वाटत असली, तरी महामार्गावर साचलेल्या वाळूमुळे होणारे संभाव्य भीषण अपघात यामुळे टळले असून अनेक वाहनधारकांचे प्राण वाचले असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.नूतन नगरसेवक असूनही अनंत गायकवाड यांनी दाखवलेली ही तत्परता आणि संवेदनशीलता कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिक व व्यावसायिकांनी दिली आहे. “लोकप्रतिनिधीने केवळ कार्यालयात बसून नव्हे, तर अशा प्रसंगी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणे महत्त्वाचे असते. नगरसेवक गायकवाड यांनी ते कृतीतून दाखवून दिले,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्काळ निर्णय घेऊन अंमलबजावणी करणारे लोकप्रतिनिधी दुर्मिळ होत चालले असताना, नगरसेवक अनंत गायकवाड यांची ही भूमिका जनतेसाठी दिलासादायक ठरली आहे. त्यांच्या या कार्याबद्दल परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करत आभार मानले आहेत.




