

परभणी | 11 जुलै ( Bedhadak awaj )Parbhani Crime News :राज्यात खासगी शाळांकडून पालकांची पिळवणूक आणि फीच्या नावाखाली होणारा छळ अजूनही सुरूच आहे. त्यातूनच परभणी जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केवळ उर्वरित फी न दिल्याने टीसी नाकारली गेली आणि त्यावरून वाद निर्माण होऊन थेट एका साध्या, वारकरी संप्रदायाच्या पालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परभणी जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.परभणी जिल्ह्यातील उखळद या गावातील रहिवासी असलेले जगन्नाथ हेंडगे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या तीन वर्षांच्या मुलीचा तिसरीसाठी प्रवेश पूर्णा तालुक्यातील हट्टा येथील हायटेक निवासी शाळेत घेतला होता. परंतु, काही दिवस शाळेत राहिल्यानंतर मुलीने “इथे मला नकोय, मला गावात शिकायचं आहे” अशी मागणी वडिलांकडे केली. आपली मुलगी अस्वस्थ असल्याचे लक्षात येताच जगन्नाथ हेंडगे यांनी शाळेतील प्रवेश रद्द करून टीसी घेण्याचा निर्णय घेतला.टीसीसाठी हेंडगे हायटेक शाळेत गेले असता त्यांनी पूर्वी भरलेली काही रक्कम परत मागितली. त्यावर संस्थाचालक प्रभाकर चव्हाण यांनी उर्वरित फी भरावी लागेल, तेव्हाच टीसी मिळेल, असा अडसर आणला. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्या वादाचे पर्यवसान चांगल्याच हाणामारीत झाले. प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नीने हेंडगे यांना बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी गंभीर होती की, त्यानंतर हेंडगे यांना तत्काळ परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.हेंडगे हे गावात अत्यंत मनमिळावू, साध्या जीवनशैलीत राहणारे आणि वारकरी संप्रदायाशी निगडित कीर्तनकार होते. फक्त तीन एकर शेतीवर आपलं कुटुंब चालवणारे हे गृहस्थ, समाजात ‘महाराज’ म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या मागे दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. एका वडिलांना आपल्या मुलीसाठी शाळा बदलायची होती, त्यासाठी ते टीसी मागायला गेले आणि तिथेच त्यांचा जीव गेला, ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे.या घटनेनंतर गावकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून, हायटेक निवासी शाळा तात्काळ बंद करून प्रभाकर चव्हाण यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी हेंडगे यांचे काका मुंजाजी हेंडगे यांच्या तक्रारीवरून पूर्णा पोलीस ठाण्यात प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला, तरी संबंधित संस्थाचालकाचा राजकीय दबदबा असल्यामुळे यापुढील कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.या घटनेत केवळ एका व्यक्तीचा मृत्यू झालेला नसून, शिक्षणव्यवस्थेतील बेशिस्त, खासगी शाळांचा मनमानी कारभार आणि पालकांच्या मूलभूत हक्कांचा संपूर्ण पायमल्ली झाला आहे. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हेंडगे कुटुंबीयांसह सर्व गावकऱ्यांनी केली आहे.