धाराशिवच्या तांदुळवाडीत जादूटोण्याची भीती; गावकरी भयभीत.

Bedhadak awaj -धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तांदुळवाडी गाव सध्या जादूटोण्याच्या भीतीखाली आहे. गावातील एका महिलेवर बचत गटातील लाखो रुपये परत न करता जादूटोण्याच्या धमक्या देण्याचा आरोप करण्यात आला आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित महिला घरांसमोर लिंबू, राख, सुया टाकत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही काही लोक असे करत असल्याचे आढळले आहे. गावातील अनेक महिला या प्रकारामुळे भयभीत झाल्या आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गावात जाऊन लोकांचे प्रबोधन केले असून, जादूटोण्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. गावकऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असली तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप केला जात आहे.
दरम्यान, राज्यात अशा घटनांमध्ये वाढ होत असून, धुळे आणि चंद्रपूर जिल्ह्यातही अघोरी प्रथा आणि जादूटोण्याशी संबंधित गंभीर प्रकरणे समोर आली आहेत.