राखी डोक्याची पिवळी माशीमार: एक दुर्मिळ दर्शन.

Bedhadak awaj -छत्रपती संभाजीनगर येथे कामानिमित्त गेलो असता, माझे मित्र वन्यजीवप्रेमी दिनेश तांबट सर आणि वसीम कादरी यांच्यासोबत या दुर्मिळ पक्ष्याचा शोध घ्यायचे ठरवले. शहरालगतच्या झाडीत आम्ही फिरलो, पण पहिल्या दिवशी पक्ष्याचे दर्शन झाले नाही. मात्र, दोन दिवसांनी पुन्हा शोध घेत असताना, शेवटी आमची प्रतीक्षा संपली. एका आंब्याच्या झाडावर चार राखी डोक्याची पिवळी माशीमार पक्षी दिसले. त्यांच्या सौंदर्याने आम्हाला मोहून टाकले आणि त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला.
हा पक्षी आकाराने छोटा आणि अत्यंत सुंदर दिसणारा आहे. त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल अधिक माहिती डॉ. राजू कसंबे यांच्या “महाराष्ट्रातील पक्षी” या ई-बुकमधून घेता येईल.
राखी डोक्याची पिवळी माशीमार (Grey-headed Canary-flycatcher)
शास्त्रीय नाव: Culicicapa ceylonensis
लांबी: 13 सेंमी (चिमणीपेक्षा लहान)
ओळख:
ताठ बसायची सवय
डोके व छाती राखी रंगाची
पाठ हिरवट रंगाची
पोटापासून खालची बाजू पिवळी
आवाज: उंच पट्टीत वारंवार केलेला जोरकस ‘चिक-व्हीची-व्हीची’
आढळ: स्थलांतरित पक्षी. मराठवाडा आणि दख्खनच्या कमी पावसाच्या प्रदेशांव्यतिरिक्त महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो. पुणे, औरंगाबाद, तसेच अहमदनगर येथे जुन्या नोंदी.
अधिवास: जंगले तसेच झाडी असलेले प्रदेश
खाद्य: उडणारे छोटे कीटक
स्थानिक नाव: राखी डोक्याची लिटकुरी
वीण कालावधी: एप्रिल ते जून (हिमालयात)
हा पक्षी हिवाळ्यात हिमालयातून स्थलांतर करून उत्तर आणि मध्य भारतात येतो. त्याचे सौंदर्य पाहून समाधान वाटले आणि अशा दुर्मिळ पक्ष्यांचे संवर्धन करण्याची गरज अधिक जाणवली.