मुंबईत ‘सक्षम 2024-25’ अभियानाला सुरुवात – हरित ऊर्जा आणि इंधन संवर्धनावर भर.

Bedhadak awaj मुंबई : भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या वतीने संपूर्ण देशभर ‘सक्षम 2024-25’ (संरक्षण क्षमता महोत्सव) अभियान राबवले जाणार आहे. या मोहिमेचा उद्देश इंधन संवर्धन, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणास प्रोत्साहन देणे आहे. यंदाच्या अभियानाची टॅगलाइन “ग्रीन अँड क्लीन एनर्जीद्वारे क्लीन एन्व्हायर्नमेंट” अशी असून, 14 फेब्रुवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत हे अभियान संपूर्ण देशभर आयोजित करण्यात येणार आहे.
मुंबईत याचे उद्घाटन समारंभ 14 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता वाय. बी. चव्हाण सेंटर, रंगस्वर हॉल, मंत्रालयासमोर होणार आहे. या कार्यक्रमात तेल उद्योगातील विविध मान्यवर, राज्य शासनाचे अधिकारी आणि तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.
सक्षम अभियानाच्या माध्यमातून इंधन कार्यक्षमतेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी वर्तनात्मक बदल घडवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील. यात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वादविवाद स्पर्धा, भिंतीचित्र (ग्राफिटी) स्पर्धा, इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा, लेख लेखन, पत्रकार परिषदा आणि टीव्ही-रेडिओवरील चर्चासत्रे आयोजित केली जातील.
या अभियानाद्वारे ओएमसी (तेल विपणन कंपन्या), शालेय विद्यार्थी, तरुण, एलपीजी वापरकर्ते, वाहनचालक, उद्योग क्षेत्रातील कर्मचारी, शेतकरी, ग्रामपंचायती आणि स्वयंसेवी संस्था यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. इंधन संवर्धनाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान याबद्दल माहिती देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील.
पेट्रोलियम उत्पादनांचा अपव्यय रोखणे, परकीय तिजोरीवरील भार कमी करणे आणि हरितगृह वायूंच्या प्रभावांपासून पर्यावरणाचे संरक्षण करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. सक्षम 2024-25 मोहिमेच्या माध्यमातून भारत स्वच्छ आणि हरित ऊर्जा वापराच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत आहे.