क्राइमदेशप्रशासनमहाराष्ट्र

बसमधील महिलांचे दागिने चोरणारी महिला चोरट्टी लातूरमध्ये अटकेत; ५ लाखांचे सोनं जप्त.

लातूर | 12 मे 2025
बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे व गंठण चोरणाऱ्या बीड जिल्ह्यातील एका महिलेला लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ५ तोळे वजनाचे, ५ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. सदर आरोपीविरुद्ध लातूर जिल्ह्यातील तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यात वाढणाऱ्या चोरी व चैन स्नॅचिंग घटनांवर आळा बसावा यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक तयार करण्यात आले होते.

हे पथक गोपनीय बातमीदारांच्या मदतीने संशयित महिला आरोपीवर लक्ष ठेवून होते. 11 मे 2025 रोजी, मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, बसस्थानक क्र. २ परिसरातून संबंधित महिलेला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत तिने लातूर शहर व जिल्ह्यातील विविध बसस्थानकांवर गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने चोरल्याची कबुली दिली.

तिच्याविरोधात अहमदपूर पोलीस ठाण्यात २ आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात १, असे एकूण ३ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिच्याकडून ५१.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले असून त्यांची अंदाजे बाजारमूल्य पाच लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.

सदर कारवाईत पो. उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार सूर्यकांत कलमे, योगेश गायकवाड, राजेश कंचे, विनोद चालवाड, तुळशीराम बरुरे, महिला पोलीस अंमलदार चिखलीकर, चालक पोलीस अंमलदार प्रदीप चोपणे आणि चंद्रकांत केंद्रे यांनी सहभाग घेतला.

पोलिसांकडून पुढील तपास सुरु असून आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button