उपनिरीक्षक भगवान के. मोरे यांच्या तपासातून नवविवाहितेच्या खुनातील पतीस जन्मठेप व दंडाची शिक्षा.

लातूर ग्रामीण पोलिसांची कार्यवाही; सबळ पुराव्यांवर न्यायालयाचा निर्णायक निकाल
लातूर | 2 मे 2025

लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या नवविवाहितेच्या खुनप्रकरणी उपनिरीक्षक भगवान के. मोरे यांच्या तपासातून मुख्य आरोपी व पती सुनिल दत्तात्रय घावीट याला जन्मठेप व 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा मा. न्यायालयाने सुनावली आहे.
मौजे कासारगाव येथे 1 ऑक्टोबर 2023 रोजी पहाटे 3 वाजता, नवविवाहिता जनाबाई सुनिल घावीट (वय 19) हिचा धारदार शस्त्राने गळ्यावर व चेहऱ्यावर वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. जनाबाई हिचा विवाह अवघ्या पाच महिन्यांपूर्वी, 12 मे 2023 रोजी, सुनिल घावीट याच्याशी झाला होता.
या प्रकरणी जनाबाई हिच्या वडिलांच्या फिर्यादीवरून कलम 302, 498(ब), 498अ, 34 भादंवि अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. आरोपींकडून पीडितेवर मोटारसायकलसाठी 1 लाख रुपयांची मागणी करून छळ होत असल्याचे स्पष्ट झाले होते.

पोउपनि भगवान मोरे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरु झाला. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय अधिकारी सुनिल गोसावी, निरीक्षक दिपक वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, तीन आरोपींविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सरकारी अभियोक्ता श्री मुंदडा यांनी फिर्यादीच्या बाजूने प्रभावी युक्तिवाद केला. न्यायालयाने साक्षीदार व पुराव्यांच्या आधारे 2 मे 2025 रोजी सुनावणी करत मुख्य आरोपीस जन्मठेप व 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला.
या यशस्वी तपासात पो.अं. सतीश लामतुरे, राहुल दरोडे व कोर्ट पैरवी अधिकारी लक्ष्मी शेळके यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.