“१६ ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतून तब्बल ₹33.04 लाखांची रक्कम परत!”

लातूर | 2 मे 2025
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे रोजी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीडीसी हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात लातूर जिल्ह्यातील चोरी व ऑनलाईन फसवणुकीतील एकूण 49.26 लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ तक्रारदारांना परत करण्यात आला. हा मुद्देमाल मा.ना. शिवेंद्रसिंह अभयसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते वाटप करण्यात आला.
गेल्या महिन्यात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत नोंदवलेल्या चोरी, घरफोडी, वाहन चोरी, मोबाईल चोरी व

ऑनलाईन फसवणुकीसंदर्भातील 59 गुन्ह्यांतील मुद्देमाल हस्तगत करण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे. या अंतर्गत खालीलप्रमाणे मालमत्ता परत करण्यात आली:
7 गुन्ह्यांतील सोनं, चांदी व रोख रक्कम – ₹9,41,065
3 वाहन चोरीच्या गुन्ह्यांतील मोटारसायकल व ट्रॅक्टर – ₹2,72,000
33 मोबाईल फोन – ₹4,08,499
16 ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रोख रक्कम – ₹33,04,529
याशिवाय, फेब्रुवारी 2025 मध्ये नांदेड परिक्षेत्राचे मा. पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या हस्ते आणखी ₹68.15 लाखांचा मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात आला होता.
यामुळे 2025 या वर्षात लातूर पोलीस दलाने एकूण 123 गुन्ह्यांतील 1.17 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून तक्रारदारांना परत केला, ही विशेष कौतुकास्पद बाब ठरली आहे. लातूर पोलिसांनी दाखवलेली कार्यक्षमतेची पावती म्हणून हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.