
परभणी | प्रतिनिधीआजच्या डिजिटल युगात तरुणाई मोठ्या प्रमाणात ऑनलाइन गेमच्या आहारी जात असल्याचं चित्र दिसून येत आहे. याच धक्कादायक वास्तवाची प्रचिती परभणी जिल्ह्यातील रायपूर गावात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेतून आली आहे. मोबाईलवरील ‘ऑनलाईन रमी’ या गेमच्या नादात एका २२ वर्षीय तरुणाने आपल्या कुटुंबाचे लाखो रुपये गमावले आणि शेवटी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला.रायपूर येथील मुंजाजी चव्हाण यांचा मुलगा राम बी.कॉम तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. मुंजाजी आणि त्यांची पत्नी मंदा हे दोघेही मोलमजुरी करून घरखर्च चालवत होते. गरिबीतूनही मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी खस्ता खाल्ल्या. दोघांनीही आयुष्यभर मोलमजुरीतून जपून ठेवलेले पैसे मुलीच्या लग्नासाठी बँकेत ठेवले होते. मात्र, रामला ऑनलाईन रमी गेम खेळण्याची सवय लागली आणि हळूहळू त्यातून तो व्यसनाधीन झाला.काही सुरुवातीच्या खेळांमध्ये मिळालेल्या लहानसहान जिंकण्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला. पण पुढे तो अधिक पैसे लावू लागला. पाहता पाहता त्याने आईच्या खात्यातील ३ ते ४ लाख रुपये उधळले. हे सर्व पैसे बहिणीच्या लग्नासाठी जमवलेले होते, याची जाणीव झाल्यावर राम तणावात गेला. कुटुंबीयांना कसे सांगावे, बहिणीच्या लग्नाचे काय होईल, आईवडील काय म्हणतील या विचारांनी त्याला ग्रासले.या मानसिक तणावातूनच रामने उंदीर मारण्याचे विषारी औषध सेवन केले. आई-वडिलांनी आपल्या एकुलत्या एक मुलाला वाचवण्यासाठी परभणीतून थेट संभाजीनगरपर्यंत विविध रुग्णालयात उपचार केले. कर्ज काढूनही त्यांनी शेवटचा प्रयत्न केला. पण डॉक्टरांचे प्रयत्न अपुरे ठरले आणि रामचा मृत्यू झाला.या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. मुलाच्या मृत्युमुळे चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे स्वप्नच उद्ध्वस्त झाले आहे. आता या कुटुंबाने ऑनलाईन रमी, लूडो, सट्टा व अशा अनेक गेम्सवर तातडीने बंदी घालण्याची मागणी केली आहे.“आम्ही कष्टाने जमवलेले पैसे अशा निर्बुद्ध गेममध्ये गेले, आमचा मुलगाही गेला. आणखी कोणत्याही कुटुंबावर अशी वेळ येऊ नये, यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत,” अशी आर्त मागणी चव्हाण कुटुंबीयांनी केली आहे.या घटनेनंतर स्थानिक पातळीवर ऑनलाईन गेमिंगविरोधात संताप व्यक्त केला जात असून अनेकांनी या व्यसनाच्या विळख्यात सापडलेल्या तरुण पिढीच्या भवितव्यासाठी तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.