
मुंबई / लातूर -लातूर ग्रामीणमधील रेणापूर येथे वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधा तातडीने वाढविण्याची आवश्यकता असून, येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात यावे, अशी ठाम मागणी शिवसेनेचे लातूर जिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री मा.ना.श्री. प्रकाश आबिटकर यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन सादर केले.रेणापूर तालुक्यात आरोग्याच्या बाबतीत अद्ययावत व्यवस्था उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. किरकोळ आजारांपासून ते वैदकिय चाचण्यांसाठी देखील रुग्णांना लातूर शहरात जावे लागते, यामुळे वेळ, पैसा आणि संसाधनांचा अपव्यय होत आहे. ही बाब लक्षात घेता, रेणापूर येथे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत आहे.या मागणीबाबत सचिन दाने यांनी आरोग्यमंत्र्यांसमोर अनेक मुद्द्यांचा यथास्थित पाढा मांडला. रेणापूर तालुक्याचे भौगोलिक विस्तार, वाढती लोकसंख्या, दुर्गम गावांचा दळणवळणाचा अभाव, तसेच सध्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची मर्यादित क्षमता या बाबींवर भर देत, उपजिल्हा रुग्णालयाच्या मंजुरीची विनंती केली.त्यावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, रेणापूर येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. विशेष म्हणजे, ते स्वतः लवकरच लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून, तेव्हा या मागणीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, लातूर ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील इतर प्रलंबित प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपआरोग्य केंद्रांच्या मंजुरीबाबतही निवेदनात मागणी करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना नियमित औषधांचा पुरवठा, तांत्रिक सुविधा, वैद्यकीय चाचणी उपकरणे आणि विशेष आरोग्य मोहीमा यांचा लाभ व्हावा यासाठीही सचिन दाने यांनी ठोस भूमिका मांडली.या भेटीत शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग होता. रेणापूरमध्ये उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाल्यास संपूर्ण तालुक्याला मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.