३ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक.

लातूर |प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील ग्रामसेवक परशुराम पंढरी गायकवाड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे, ही दुसरी वेळ आहे की परशुराम गायकवाड एसीबीच्या सापळ्यात अडकला आहे.
तक्रारदाराने आपल्या शेतीसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (MGNREGA) अहिल्यादेवी सिंचन विहिरीचा प्रस्ताव पंचायत समिती चाकूर येथे दाखल केला होता. त्यासंबंधी सहाय्य करण्यासाठी, तसेच पुढील कामकाज मार्गी लावण्याच्या मोबदल्यात ग्रामसेवक गायकवाड याने ३ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.

त्यानंतर २० जून २०२५ रोजी लातूर एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, गायकवाड यांनी पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, त्याच दिवशी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास तक्रारदार हे चाकूर बस स्थानकाजवळील कॅन्टीनमध्ये ग्रामसेवक परशुराम गायकवाड यांना लाचेची रक्कम देण्यासाठी गेले. गायकवाड यांनी ती रक्कम स्वखुशीने स्वीकारली आणि त्याचवेळी एसीबीच्या पथकाने त्यांना पंचांसमक्ष रंगेहाथ अटक केली.
तक्रारदाराच्या फिर्यादीवरून गायकवाड यांच्या विरोधात चाकूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा तपास लातूर एसीबीचे पोलिस उपअधीक्षक पंडित रेजितवाड करत आहेत.
ही संपूर्ण सापळा कारवाई डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात उपअधीक्षक पंडित रेजितवाड, पोलिस निरीक्षक भास्कर पुल्ली, अन्वर मुजावर, फारुक दामटे, भागवत कठारे, शाम गिरी, भीमराव आलुरे, संतोष गिरी, शिवशंकर कच्छवे, रुपाली भोसले, संदीप जाधव, मंगेश कोंडरे, गजानन जाधव व संतोष क्षीरसागर यांनी सहभाग घेतला.
परशुराम गायकवाड यांच्याविरुद्ध यापूर्वीही लाचप्रकरणी कारवाई झाली होती. त्यामुळे प्रशासनातील भ्रष्टाचार, ग्रामसेवकांच्या बेजबाबदार वर्तनाचे गंभीर चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.