
लातूर | प्रतिनिधी |दि 21/05/2025
लातूर शहरात काकज प्रतिष्ठान व एसपी पब्लिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या गुणगौरव व सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा भव्य सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास लातूरचे लोकप्रिय आमदार अमित देशमुख, आमदार विक्रमजी काळे, तसेच विविध प्रशासकीय, शैक्षणिक, औद्योगिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार अमित देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “समाजहितासाठी कार्य करणाऱ्यांचे जेव्हा सार्वजनिकरित्या कौतुक होते, तेव्हा त्या कार्याला नवी ऊर्जा मिळते. अशा उपक्रमांमधून प्रेरणा घेऊन नव्या पिढीतील कार्यकर्ते समाजासाठी अधिक जबाबदारीने पुढे येतात.” तसेच त्यांनी लातूरच्या जनतेचे आणि नेतृत्वाचे नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन आणि सहकार्य याबद्दल कौतुक केले.

या कार्यक्रमात शिक्षण, आरोग्य, कृषी, सहकार, उद्योग, सामाजिक कार्य, राजकारण, क्रीडा अशा विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. लातूरमध्ये घडणाऱ्या सकारात्मक उपक्रमांमुळे संपूर्ण राज्यात आणि देशात या शहराचा वेगळा ‘पॅटर्न’ निर्माण झाला असून, तो इतर ठिकाणी अनुकरणीय ठरत असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
विजयकुमार धुमाळ, त्यांचे बंधू आणि काकाज प्रतिष्ठानच्या संपूर्ण परिवाराचे या सर्जनशील आणि प्रेरणादायी उपक्रमासाठी मान्यवरांनी अभिनंदन केले.
आमदार विक्रम काळे यांनी देखील समाजात प्रेरणादायी कार्य करणाऱ्यांना सन्मानित करण्याच्या परंपरेचं महत्त्व पटवून दिलं आणि सांगितले की, “सकारात्मक कार्याची दखल घेणं ही सामाजिक बांधिलकी आहे, जी पुढील पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरते.”
या सन्मान सोहळ्यामुळे लातूरच्या सामाजिक-सांस्कृतिक जडणघडणीत भर पडली असून, लोकप्रतिनिधी आणि समाजातील कार्यकर्त्यांमधील बंध अधिक दृढ झाले आहेत.