क्राइमदेशप्रशासनमहाराष्ट्रराजकारण

गरुड चौकात गेल्या काही महिन्यांत सलग तिसरा अपघात

लातूर : लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील गरुड चौक पुन्हा एकदा भीषण अपघातामुळे हादरला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या सकाळी दहाच्या सुमारास गवळीनगर भागातील बसवराज स्वामी (वय ४०) हे रस्ता ओलांडत असताना टीएस १५ यु सी ९४४४ क्रमांकाचा भरधाव ट्रक बाभळगाव नाक्याकडे वळण घेताना त्यांना धडकला. या धडकेत ते खाली पडले व ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाले. तत्काळ त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.गरुड चौकात गेल्या काही महिन्यांत सलग तिसरा अपघात घडल्याने हा चौक अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरू लागला आहे. महामार्ग विकास कामातील त्रुटी, चुकीचे नियोजन, सर्व्हिस रोडचा अभाव, दुभाजकांचे अतिरेकी बांधकाम, चौकात गतिरोधकांचा अभाव आणि सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे यामुळे वाहतुकीत गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. या सर्व कारणांमुळे नागरिकांना रोज जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो.या पार्श्वभूमीवर लातूर शहर पूर्वभाग नागरी हक्क कृती समितीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि महापालिका आयुक्त यांना निवेदन देऊन अपघात नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. समितीने गरुड चौकात पोलीस मदत केंद्र सुरू करणे, अतिक्रमण हटवणे, गतिरोधक बसवणे, छोटे वर्तुळ बांधून प्रदूषण नियंत्रणासाठी कारंजे उभारणे आणि वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक करण्यासह विविध मागण्या केल्या आहेत.बसवराज स्वामी यांच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने पावले न उचलल्यास हा चौक नागरिकांच्या जीवनासाठी अधिक धोकादायक ठरेल, असा इशारा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button