

लातूर, ३० जून २०२५ – ( Bedhadak awaj )
लातूर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून अमोल तांबे यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. पोलीस अधीक्षक कार्यालयात एका साध्या पण औपचारिक समारंभात मावळते पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी त्यांचे स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. परंतु पदभार स्वीकारताच अमोल तांबे यांनी लगेच पत्रकार परिषद घेतली आणि एक नवा पायंडा पाडला.
या पत्रकार परिषदेत त्यांनी उपस्थित पत्रकारांशी थेट संवाद साधत विचारणा केली की, लातूर जिल्ह्यातील काय प्रश्न सर्वाधिक गंभीर आहेत आणि स्थानिक पोलीस यंत्रणेकडून काय अपेक्षा आहेत. त्यानंतर पत्रकारांनी एकामागोमाग एक प्रश्नांचा, समस्या आणि तक्रारींचा अक्षरशः पाढा वाचला. लातूर जिल्ह्यात वाढलेली गुन्हेगारी, अमली पदार्थांची निर्मिती व विक्री, लॉजवर व घरगुती चालणारा वेश्याव्यवसाय, अवैध दारूचा खुला व्यापार, चोरी, खून, कॉफी शॉपच्या आड चालणारे अश्लील चाळे, गुटखा, मटका, राशनचा काळाबाजार, वाहतुकीची विस्कळीत व्यवस्था आणि पोलीस दलातील अरेरावी वागणूक यांसारख्या अनेक मुद्द्यांवर पत्रकारांनी थेट आणि तीव्र स्वरात नव्या पोलीस अधीक्षकांसमोर प्रश्न उपस्थित केले.
या सगळ्या प्रश्नांमागे एक स्पष्ट छटा होती लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचं चित्र दिवसेंदिवस ढासळत आहे, आणि यामागे पोलीस दलात चालणारा मनमानीपणा, स्थानिक राजकीय नेत्यांचा दबाव आणि जबाबदारी झटकण्याची मानसिकता हे प्रमुख कारण ठरत आहेत. पत्रकारांनी अप्रत्यक्षपणे मावळते पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या कार्यकाळावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या व्यक्तिगत स्वच्छ प्रतिमेला धक्का न लावताच, त्यांच्या कार्यकाळा वरील समस्यांकडे दुर्लक्ष झालं, हे वास्तव चर्चेत आलं.
लातूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून काही पोलीस ठाण्यांमध्ये स्थानिक राजकीय हस्तक्षेपामुळे पोलीस आपलं काम करु शकत नाहीत, असा आरोप जनतेतून सातत्याने होत आहे. अनेक पोलीस कर्मचारी केवळ वरच्या दबावामुळे गुन्हेगारीकडे डोळेझाक करत असल्याचं चित्र सध्या स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे “जे चालतंय ते चालू द्या” हे धोरण पोलीस दलात खोलवर रुजले आहे, आणि त्यातूनच लातूरसारख्या जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण बिनधास्त वाढले आहे.
या पार्श्वभूमीवर नवे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संवाद सुरू केला आहे, ही सकारात्मक बाब आहे. मात्र केवळ संवादाने नव्हे, तर थेट कारवाई, पोलीस दलातील शिस्त, आणि राजकीय हस्तक्षेपाला रोख हेच घटक आता लातूर जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी निर्णायक ठरणार आहेत. लातूरच्या जनतेने आता पोलीस दलाकडून ठोस कृतीची अपेक्षा ठेवली आहे. अमोल तांबे यांनी गुन्हेगारीच्या मुळाशी जाऊन कारवाई केली, तरच या जिल्ह्याला पुन्हा एकदा कायद्याचा धाक आणि नागरिकांच्या सुरक्षेचा विश्वास मिळू शकेल.
मावळते पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्याला त्यांच्या परीने चांगले नेतृत्व दिले असले तरी अनेक अपूर्ण राहिलेल्या प्रश्नांमुळे नव्या पोलीस अधीक्षकांपुढे कामाचे आव्हान अधिकच मोठं आहे. लातूर जिल्ह्याच्या भविष्यासाठी ही वेळ निर्णायक असून, अमोल तांबे यांचं पुढील नेतृत्व काय दिशा घेणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.