Latur स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई; आंतरराज्य टोळीतील आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

लातूर: शहरातील एका साखरपुड्याच्या कार्यक्रमादरम्यान चोरीला गेलेले 30 तोळे वजनाचे, 9 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने हस्तगत केले आहेत. या कारवाईत आंतरराज्य टोळीतील तीन आरोपींचा शोध घेण्यात आला असून, गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.
घटनेचा आढावा:
लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत साखरपुड्याच्या कार्यक्रमादरम्यान अज्ञात आरोपींनी दागिन्यांनी भरलेली बॅग चोरी केली होती. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशाने विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले.
गुप्त माहितीवरून कारवाई:
8 डिसेंबर 2024 रोजी विशेष पथकाला माहिती मिळाली की, चोरीतील आरोपी मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील बोडा गावातील आहेत. या माहितीच्या आधारे पथकाने आठ दिवस मध्यप्रदेशात तपास करून आरोपींची ओळख पटवली. आरोपींनी चोरी केलेले दागिने एका महिला नातेवाईकाकडे लपवून ठेवले होती अशी माहिती समजते.
हस्तगत मुद्देमाल:
आरोपींची नावे:
- सोनू गोकुळप्रसाद सिसोदिया (वय 20)
- मेहताब नथूसिंग सिसोदिया (वय 25)
- कालू बनवारी सिसोदिया (वय 20)
पथकाने कुशलतेने तपास करून 30 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले. मात्र, लातूर पोलीस पथक गावात पोहोचल्याचे समजताच आरोपी फरार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.
पथकाची कामगिरी:
या कारवाईत पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड, सायबर सेलचे उपनिरीक्षक हीना शेख, व पोलीस अमलदार राहुल सोनकांबळे, खुर्रम काझी, युवराज गिरी यांचा मोलाचा सहभाग होता.
गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस उपनिरीक्षक राजपूत करत आहेत.