बाहेरच्या गुन्हे शाखेची कारवाई आणि स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?

लातूर | बेधडक आवाज /Bedhadak awaj
लातूर शहरात अमली पदार्थांविरोधात कारवाई सुरू असल्याचे चित्र अधिकृत पातळीवर रंगवले जात असले, तरी प्रत्यक्षात नशेचा व्यवसाय मात्र शहरात निर्धोकपणे फोफावत असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने लातूरमध्ये केलेल्या कारवाईत तब्बल १६ लाख ३२ हजार रुपये किमतीच्या कोडीनयुक्त कफ सिरपच्या ४,०८० बाटल्या जप्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे ही कारवाई लातूर पोलिसांनी नव्हे, तर बाहेरच्या जिल्ह्यातील गुन्हे शाखेने केली, ही बाबच अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरते.
या प्रकरणात लातूरमधील ‘मराठवाडा मेडिकल’चा मालक सय्यद शाहीद अली याला अटक करण्यात आली असून, हा साठा संभाजीनगरमधील रेकॉर्डवरील फरार आरोपी अशपाक पटेल याला दिला जाणार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अशपाक पटेल हा या आंतरजिल्हा रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आहे.
मात्र या कारवाईपेक्षा अधिक गंभीर बाब म्हणजे इतका मोठा नशेचा साठा लातूर शहरात कसा आणि किती काळ साठवून ठेवण्यात आला होता. ३४ बॉक्समध्ये भरलेला कोडीनयुक्त कफ सिरप ट्रान्सपोर्ट गोदामात ठेवला जातो, मेडिकल दुकानातून त्याची विक्री होते आणि तरीही स्थानिक गुन्हे शाखेला याचा सुगावा लागत नाही, ही बाब लातूर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्न उपस्थित करते.
हे प्रकरण केवळ कोडीनयुक्त कफ सिरपपुरते मर्यादित नाही. लातूर शहरात पासमोलीन, रेस्टील, अल्प्राझोलम यांसारख्या औषधांचा नशेसाठी सर्रास वापर आणि बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचे वास्तव सर्वश्रुत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याविना मिळू नयेत अशा औषधांचा खुलेआम बाजार शहरात सुरू असताना, औषध नियंत्रण यंत्रणा आणि पोलिस प्रशासन यांचे दुर्लक्ष संशयास्पद ठरत आहे.
सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, जर संभाजीनगरच्या गुन्हे शाखेला लातूरमधील नशेच्या रॅकेटचा माग काढता येतो, तर लातूरची स्थानिक गुन्हे शाखा नेमके काय करत होती. गुन्हे उकल करण्यात एक नंबर असल्याचा दावा करणारी यंत्रणा अशा गंभीर गुन्ह्यांकडे दुर्लक्ष कसे करते, की मग हे दुर्लक्ष जाणूनबुजून केले जाते, हा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे.
एका मेडिकल दुकानाच्या मालकाला अटक करून हे प्रकरण संपणार नाही. या रॅकेटला संरक्षण देणारे, डोळेझाक करणारे किंवा माहिती असूनही गप्प बसणारे घटक कोण आहेत, याचा शोध घेणे तितकेच आवश्यक आहे. अन्यथा आज कोडीनयुक्त कफ सिरप, उद्या दुसरे औषध आणि परवा आणखी एखादा नशेचा प्रकार, अशा पद्धतीने लातूर शहर नशेच्या विळख्यात अडकत जाणार आहे.
ही कारवाई केवळ जप्तीपुरती मर्यादित न ठेवता, लातूरमधील नशेच्या साखळीचा पूर्णपणे छडा लावला गेला, तरच या शहराला या विषारी व्यापारापासून मुक्त करता येईल. अन्यथा बाहेरच्या जिल्ह्यातील पोलिसांनी येऊन कारवाई करणे आणि स्थानिक यंत्रणेने मौन बाळगणे, हे चित्र लातूरच्या सुरक्षेसाठी धोक्याची घंटा ठरत राहील.




