फडणवीसांचा सन्मान, पवारांची भविष्यवाणी आणि कलेक्टरची बदली तीन घटनांचा एकच अर्थ ?

लातूर | (शरद पवार ) मुंबईत 28 मार्चला सह्याद्री अतिथीगृहात देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा ठाकूर-घुगे यांचा सन्मान होत होता… राज्यातील उत्कृष्ट प्रशासनाचा आदर्श म्हणून लातूरची दखल घेतली जात होती. वरकरणी हा गौरवाचा क्षण पण याच क्षणाच्या सावलीत लातूरमध्ये वेगळीच पटकथा रंगत होती.
कारण सन्मानाच्या आदल्या दिवशी, 27 मार्चला, देवाभाऊ जॉब एक्स्पोच्या मंचावर अभिमन्यू पवार यांनी केलेली घोषणा ही साधी राजकीय भाषा नव्हती ती थेट ‘डिक्लेरेशन’ होती. औसा आणि बेलकुंड एमआयडीसीबाबत त्यांनी ज्या पद्धतीने हजारो एकर जमीन, नॅशनल हायवे, एअरपोर्ट, रेल्वे कनेक्टिव्हिटी यांची मांडणी केली, ते पाहता ते एखाद्या प्रोजेक्टचा ‘ब्लूप्रिंट’ वाचत आहेत, असा भास होत होता. शब्दांत खात्री होती.आणि त्या खात्रीतूनच एक संकेत स्पष्ट दिसत होता: “हे ठरलं आहे… आणि हे होणारच आहे.”
आणि मग काही दिवसांतच तिसरी चाल लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची थेट Maharashtra Industrial Development Corporation मध्ये सह मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली.
इथेच प्रश्न धारदार होतो.
एकीकडे मुख्यमंत्री स्वतः सन्मान करतात… दुसरीकडे स्थानिक पातळीवर औद्योगिक विस्ताराचा रोडमॅप जाहीर होतो… आणि तिसरीकडे त्या सगळ्याची अंमलबजावणी करू शकणारा अधिकारी नेमक्या त्या क्षेत्राशी संबंधित संस्थेत पोहोचतो. ही साखळी इतकी परफेक्ट बसते की तिला ‘योगायोग’ म्हणणं म्हणजे वास्तवाची थट्टा करणं ठरेल.
कारण प्रशासनात एक न लिहिलेला नियम असतो.मोठ्या प्रकल्पांपूर्वी वातावरण तयार केलं जातं. आधी घोषणा होतात, मग त्या घोषणांना विश्वासार्हता देण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची (राजकारण्यांच्या नजरेत)नेमणूक केली जाते. आणि इथेही नेमकं तेच घडत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसतंय.
वर्षा ठाकूर-घुगे यांनी लातूरमध्ये जे काम केलं, ते फक्त फाईलपुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी सिस्टम हलवली, गती दिली, आणि प्रशासन ‘रन’ करून दाखवलं. त्यावरती सत्ताधारी नेते खुश होते त्यानुसार सरकारच्या नजरेत सर्वसामान्यांच्या नसेल ही म्हणजेच काम करून दाखवणारा अधिकारी. आणि अशा अधिकाऱ्याला एमआयडीसीसारख्या संस्थेत नेमणं म्हणजे केवळ बदली नाही, तर ‘टार्गेटेड प्लेसमेंट’ असं सरळ भाषेत म्हणावं लागेल.
म्हणूनच अभिमन्यू पवार यांची ‘भविष्यवाणी’ आणि त्यानंतर झालेली ही बदली ही वेगवेगळी घटना नसून एकाच साखळीचे दुवे आहेत, अशी चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे. औसा आणि बेलकुंड एमआयडीसीचा विस्तार हा फक्त राजकीय भाषणाचा मुद्दा नाही, तर तो आधीच ठरवलेला औद्योगिक प्रकल्प असण्याची शक्यता अधिक ठळक होते.
पण या सगळ्या ‘मोठ्या खेळा’त एक गोष्ट पुन्हा मागे पडते लातूरचा सामान्य नागरिक.
कारण याच लातूरमध्ये यापूर्वीही एमआयडीसीच्या नावावर स्वप्नं रंगवली गेली. रोजगाराच्या घोषणा झाल्या. उद्योग येणार, विकास होणार असं सांगितलं गेलं. पण वास्तवात त्या गतीने काहीच घडलं नाही. त्यामुळे आज पुन्हा मोठ्या घोषणांचा आवाज येतोय, तेव्हा लोकांच्या मनात विश्वासापेक्षा संशय जास्त आहे.
दरम्यान, भारत बास्टेवाड यांच्याकडे आता जिल्ह्याची सूत्रं आहेत. पण त्यांच्यासमोर केवळ प्रशासन नाही.तर या संपूर्ण ‘सेटअप’चा परिणाम हाताळण्याचं आव्हान आहे.
शेवटी एक गोष्ट स्पष्ट होते.सन्मान, घोषणा आणि बदली… हे तीन वेगळे प्रसंग नाहीत. हा एक ‘कॅल्क्युलेटेड मूव्ह’ आहे. लातूरच्या औद्योगिक भवितव्याचा नवा नकाशा आखण्याची ही सुरुवात आहे.
आता प्रश्न एकच हा नकाशा खरोखर लातूरकरांसाठी आहे का, की तो कुणाच्या तरी आधीच ठरलेल्या फायद्यासाठी तयार केला जातोय?
उत्तर अजून मिळालेलं नाही… पण घटनांची गती पाहता, हे ‘योगायोग’ नाही.हे ‘नियोजन’ आहे, हे मात्र स्पष्टपणे दिसत आहे.




