शिरूर अनंतपाळ येथे चौथ्या मराठी साहित्य संमेलनाला उत्साहात सुरुवात.

लातूर : दि:-02/02/2025
मराठी भाषा आणि वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी लातूर जिल्ह्यातील सीमावर्ती शिरूर अनंतपाळ येथे चौथ्या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी ग्रंथदिंडी आणि भव्य शोभायात्रेने संमेलनाला उत्साहात सुरुवात झाली.

साहित्य आणि संस्कृती संवर्धन मंडळ व मराठवाडा साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक देविदासराव फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी मराठीच्या संवर्धनावर भर देत दररोजच्या जीवनात मराठी शब्दांचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले.
ग्रामीण भागातील वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात कथाकथन, कविसंमेलन, परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील नवसाहित्यिकांना व्यासपीठ मिळावे आणि मराठी भाषा घराघरात पोहोचावी, हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे.