देशप्रशासनमहाराष्ट्रराजकारण

मनपा कर्मचाऱ्यांसाठी गणवेश सक्तीची मागणी; कृती समितीचा मनपाला इशारा.

लातूर – लातूर शहर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना गणवेश (ड्रेस कोड) सक्तीने लागू करावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे सुशोभीकरण करावे, स्वामी विवेकानंद जलकुंभ परिसरात वॉकिंग ट्रॅक आणि ओपन जिम उभारावे, तसेच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सार्वजनिक वाचनालय उभारण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी लातूर शहर पूर्व भाग नागरी हक्क कृती समितीने महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी समितीच्या वतीने येत्या 10 दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

महानगरपालिकेला फाईव्ह स्टार दर्जा मिळालेला असूनही कर्मचाऱ्यांना गणवेश नसेल, तर नागरिकांना कर्मचाऱ्यांची ओळख पटत नाही, त्यामुळे शिस्त आणि पारदर्शकतेसाठी गणवेश सक्तीची गरज असल्याचे समितीचे म्हणणे आहे.

तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या सुशोभीकरणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पूर्व भागात वॉकिंग ट्रॅक नसल्यामुळे नागरिक रस्त्यावर व्यायाम करताना अपघाताचा धोका संभवतो, त्यामुळे स्वामी विवेकानंद जलकुंभ परिसरात वॉकिंग ट्रॅक आणि ओपन जिम तात्काळ उभारण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळील मोकळ्या जागेत सार्वजनिक वाचनालय उभारण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

या मागण्या वारंवार निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे 10 दिवसांत सकारात्मक पाऊल उचलले नाही, तर महानगरपालिका कार्यालयात तीव्र आंदोलन छेडले जाईल, याची जबाबदारी मनपावर राहील, असा स्पष्ट इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी कृती समितीचे अध्यक्ष दीपक गंगणे, संस्थापक बाबासाहेब बनसोडे, नितीन चालक, भगवेश्वर धनगर आदी सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button