काँग्रेस पक्षाचे ‘वर्कहॉलिक’ लातूर शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव

लातूर – प्रामाणिकपणा, निष्ठा आणि अथक मेहनतीच्या बळावर आपल्या राजकीय प्रवासाची पायाभरणी करणारे लातूर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव यांचा आज वाढदिवस. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले हे नाव आज लातूरच्या राजकीय क्षितिजावर सेवाभाव, शिस्त आणि कार्यतत्परतेचं प्रतीक बनलं आहे. संघर्षाच्या वाटेवर चालत, लोकांमध्ये राहून आणि संघटनाला नवसंजीवनी देत त्यांनी स्वतःला खऱ्या अर्थाने “वर्कहॉलिक” नेतृत्व म्हणून सिद्ध केलं आहे. त्यांचा प्रवास ही फक्त राजकीय पदापर्यंत पोहोचण्याची गोष्ट नाही, तर ती आहे निष्ठा, समर्पण आणि जनसेवेच्या अखंड व्रताची कहाणी.
ॲड. किरण जाधव यांनी युवक काँग्रेसच्या प्रभागाध्यक्षपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. कार्यकर्त्यांमध्ये मिसळण्याची त्यांची सहज वृत्ती, जबाबदारीची जाणीव आणि कामाप्रती असलेली निष्ठा पाहून पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि २०२० साली त्यांना लातूर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्या दिवसापासून ते पक्ष संघटनेला नवा चेहरा, नवी ऊर्जा आणि नवे दिशा देत आहेत. लोकनेते विलासराव देशमुख यांचे आशीर्वाद, सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांची प्रेरणा, आमदार अमित देशमुख यांचे मार्गदर्शन आणि माजी आमदार धीरज देशमुख यांचे सहकार्य या चार आधारस्तंभांवर त्यांनी लातूर शहर काँग्रेसचा किल्ला पुन्हा मजबूत केला आहे.
देशमुख कुटुंबीयांच्या लोकसेवेच्या परंपरेला त्यांनी समर्पित भावनेने पुढे नेले. विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम आयोजित करणे, आमदार अमित देशमुख व माजी आमदार धीरज देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पथ विक्रेत्यांना छत्र्या, गरजूना चष्मे व ब्लँकेट्स वाटप करणे, अशा अनेक उपक्रमांद्वारे त्यांनी “वाढदिवस म्हणजे जनसेवा” ही परंपरा लातूरमध्ये रुजवली. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला हात दिला आणि राजकीय नेत्याचा वाढदिवस साजरा करतानाही जनतेचा विचार कसा करता येतो याचं जिवंत उदाहरण निर्माण केलं.
कोरोना महामारीच्या काळात त्यांच्या नेतृत्वाची खरी परीक्षा झाली. शहरात भय आणि अनिश्चिततेचे वातावरण असताना, आमदार अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काँग्रेस भवन येथे ‘किचन’ सुरू केले. या उपक्रमातून दररोज शेकडो अन्नाचे डबे रुग्णालयांमधील रुग्णांपर्यंत पोहोचवले गेले. मास्क, सॅनिटायझर आणि औषधे वाटप, अन्नधान्य वितरण, तसेच वैद्यकीय मदतीसाठी तत्परता दाखवत त्यांनी संकटाच्या काळात काँग्रेस पक्ष जनतेच्या सोबत असल्याचा दृढ विश्वास निर्माण केला.
शहराध्यक्ष म्हणून ॲड. किरण जाधव यांनी संघटनात नवा जोम आणला. त्यांनी केवळ निवडणुका जिंकण्यावर लक्ष न ठेवता, प्रत्येक कार्यकर्ता पक्षाचा खरा चेहरा आहे ही जाणीव रुजवली. प्रभागाध्यक्षांपासून बूथ पातळीपर्यंत जबाबदाऱ्या ठरवून, सर्वसमावेशक कार्यकारिणी तयार करून त्यांनी काँग्रेस संघटनेला बळ दिले. विविध महापुरुषांच्या जयंती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांतून काँग्रेसचा सर्वधर्मसमभावाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. त्यांच्या नेतृत्वाखाली लातूर शहर काँग्रेस पुन्हा जोमाने उभी राहत आहे, आणि महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षाच्या विजयरथाची घोडदौड सुरू झाली आहे.
राजकारणासोबतच ॲड. किरण जाधव यांनी बँकिंग क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आमदार अमित देशमुख यांच्या विश्वासास पात्र ठरत त्यांनी विलास सहकारी बँकेचे तज्ञ संचालक म्हणून काम पाहिले आणि नंतर चेअरमनपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या कार्यकाळात बँकेच्या कामकाजात पारदर्शकता, ग्राहकाभिमुखता आणि वाढ या सर्व क्षेत्रांत सकारात्मक बदल झाले.
आज ॲड. किरण जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर शहरातील प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता आणि नागरिक त्यांच्या कार्याचे कौतुक करताना अभिमानाने म्हणतो हे आमचे शहराध्यक्ष, आमचे लढवय्ये! संघर्षातून उभा राहून राजकारणात प्रामाणिकतेने आणि जबाबदारीने कार्य करणारा नेता काय असतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या हातून पक्षाची ध्येयधोरणे अधिक बळकट व्हावीत, काँग्रेसचा झेंडा पुन्हा एकदा महापालिकेत फडकावा, आणि त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे, हीच सर्व लातूरकरांची आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची मनःपूर्वक प्रार्थना.




