“सर्व पर्याय खुले” म्हणजे जनमताची बोळवण? विक्रांत गोजमगुंडे नेमकं कोणाच्या दारात सत्ता मागणार!

लातूर |(बेधडक आवाज)
लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष ठरणार, असे स्वप्न विक्रांत गोजमगुंडे रंगवत असताना त्यांचेच एक वाक्य आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. “सर्व पर्याय आमच्यासाठी खुले आहेत.”
हा आत्मविश्वास आहे की सत्तेसाठीची अस्वस्थ घाई, हा खरा प्रश्न आहे.
दलित, मुस्लिम, ओबीसी, अल्पसंख्याक, अठरापगड जाती आणि सर्वधर्मसमभावाची भाषा करत मतं मागायची आणि निकालानंतर “समान अजेंडा” या गोंडस शब्दाआड कुणाशीही चर्चा करायची ही भूमिका म्हणजे जनतेने दाखवलेल्या विश्वासाला हरताळ फासण्याचा प्रकार नाही का? मतदारांनी दिलेला कौल विकासासाठी होता की सत्तेच्या सौदेबाजीसाठी, याचे उत्तर गोजमगुंडेंनी द्यायला हवे.
धर्मनिरपेक्षतेची शपथ घेऊन प्रचार करायचा आणि निकालानंतर “गरज पडली तर” युतीचे दरवाजे उघडे ठेवायचे मग नेमकं समर्थन कुणाचं? ज्यांच्या विरोधात मतदार कौल देतील, त्यांच्याच मांडीला मांडी लावून सत्ता स्थापन करायची तयारी तर नाही ना? हा प्रश्न आता लातूरच्या जनतेच्या मनात घोंगावत आहे.
अजित पवारांच्या सभेने वारे फिरले, गर्दी उसळली, हे मान्य. पण त्या गर्दीचा अर्थ स्पष्ट आहे.लोकांनी राष्ट्रवादीवर विश्वास टाकला. हा विश्वास विकासासाठी होता, की नंतर “सर्व पर्याय खुले” ठेवून सत्तेच्या तडजोडीसाठी? जर जनमताचा अर्थ निकालानंतर बदलणार असेल, तर मग प्रचारात दिलेली आश्वासने फक्त घोषणाबाजी ठरतात.
आज विक्रांत गोजमगुंडे यांना एकच प्रश्न टाळता येणार नाही
जनतेने तुम्हाला मत द्यायचे ते कोणाच्या विरोधात आणि तुम्ही सत्ता स्थापन करताना उभे राहणार नेमकं कोणाच्या बाजूने?
कारण सर्व पर्याय खुले असतात, पण जनतेचा विश्वास एकदाच मिळतो तो गमावला, तर उरतात फक्त पर्याय, सत्ता नाही.




