मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेले होते.जेवण आटोपून घरी परतत असताना,अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

बेधडक आवाज :-
यवतमाळ जिल्ह्यातील नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर महागाव ते मुडाणा या दरम्यान शुक्रवारी मध्यरात्री एक दुर्दैवी घटना घडली. अर्जुन राजेंद्र देशमुख (वय 19) आणि अजय सतीश विरखेडे (वय 22) या दोन विद्यार्थ्यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे अपघातानंतर मृतदेह व दुचाकी महामार्गालगतच्या नालीत फेकून दिल्याने हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे मित्र शुक्रवारी रात्री नांदगव्हाण येथे मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेले होते. जेवण आटोपून घरी परतत असताना, नागपूर-बोरी महामार्गावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यानंतर अज्ञात वाहनचालकाने मृतदेह व दुचाकी काही अंतरावर असलेल्या नालीत टाकून घटनास्थळावरून पळ काढला.
सकाळी शेतात गेलेल्या एका शेतकऱ्याला मृतदेह व दुचाकी आढळून आली. त्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली. महागाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करून मृतदेह सवना ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, घातपाताचा संशय घेत तपास सुरू केला आहे.
ही घटना परिसरात खळबळ उडवणारी ठरली आहे. पोलिसांचा तपास सुरू असून अज्ञात वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.