बीड परळी महामार्गावर भीषण अपघात; तीन पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांचा मृत्यू.

बेधडक आवाज -(बीड) परळी महामार्गावर आज (19 जानेवारी) पहाटे व्यायामाला गेलेल्या तीन तरुणांना भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसने चिरडले. या अपघातात तीनही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. बालाजी मोरे, ओम घोडके आणि विराज घोडके अशी मृत तरुणांची नावे आहेत. हे तिघेही पोलीस भरतीची तयारी करत होते.
घोडका राजुरी परिसरात हा अपघात झाला असून अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. सिमेंटच्या रस्त्यावरून बस घसरल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात अपघातांची संख्या वाढत असून चालकाची चूक, रस्त्यांची दुरवस्था आणि वेगवान वाहने यामुळे असे अपघात सातत्याने होत आहेत. परळी महामार्गावर झालेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा महामार्ग सुरक्षा आणि वाहतुकीच्या नियमांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.