लातूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 15 मधून उमेदवारी, जनतेत अपेक्षांची लाट…

लातूर | दि. 21/12/2025 (बेधडक आवाज)
लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मधून ऋषिकेश विलासराव कदम हे उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर येताच परिसरात राजकीय तसेच सामाजिक चर्चांना वेग आला आहे. मात्र ऋषिकेश कदम यांचं नाव चर्चेत येण्यामागे केवळ निवडणूक राजकारण नाही, तर त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जपलेलं समाजाशी असलेलं नातं कारणीभूत ठरत आहे.
समाजकार्यात नेहमीच अग्रभागी असणारे ऋषिकेश कदम हे विशेषतः नवतरुणांसाठी आशेचा किरण म्हणून पाहिले जातात. आर्थिक अडचणी, रोजगाराचा प्रश्न किंवा व्यवसाय उभारणीसाठी लागणारा आधार अशा अनेक टप्प्यांवर त्यांनी तरुणांना केवळ सल्ले दिले नाहीत, तर प्रत्यक्ष मदतीचा हात पुढे केला आहे. कोणतीही अडचण समोर आली की ती क्षणिक आहे की मोठी, याचा विचार न करता लागलीच मदत करण्याची त्यांची भूमिका अनेकांनी प्रत्यक्ष अनुभवलेली आहे.
मदत करून थांबणं हा त्यांचा स्वभाव नाही. “पुन्हा काही अडचण आली तर मला नक्की कळव,” हे शब्द ते तरुणांना केवळ औपचारिकपणे नाही, तर आपुलकीने, मायेने आणि जबाबदारीच्या भावनेतून सांगतात. त्यामुळेच अनेक तरुण आजही ऋषिकेश कदम यांच्याकडे केवळ कार्यकर्ता म्हणून नाही, तर आपला माणूस म्हणून पाहतात.
समाजकार्यातील त्यांची भूमिका केवळ व्यक्तीगत मदतीपुरती मर्यादित राहिलेली नाही. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय आणि विविध प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्याचं कामही त्यांनी सक्रियपणे केलं आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांचे प्रश्न प्रशासनाच्या पातळीवर मांडणे, संघटित पद्धतीने पाठपुरावा करणे आणि शांततेच्या मार्गाने मार्ग काढण्यावर त्यांचा नेहमीच भर राहिला आहे. अनेक सामाजिक चळवळी, आंदोलनात्मक उपक्रम आणि समाजहिताच्या प्रश्नांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला असून, त्यामुळेच त्यांची ओळख केवळ एका प्रभागापुरती न राहता सामाजिक कार्यकर्त्याच्या भूमिकेत अधिक ठळकपणे झाली आहे.
लातूर शहरात शिवजन्मोत्सव पालखी सोहळ्याच्या आयोजनातून त्यांनी सर्व समाजघटकांना एकत्र आणण्याचं काम केलं आहे. कोणताही दिखावा न करता, कोणताही राजकीय लाभ न पाहता, भावनिक ओलावा जपत आणि निर्मळ मनाने हे उपक्रम सातत्याने राबवले गेले आहेत. या माध्यमातून केवळ उत्सव साजरा झाला नाही, तर लातूरकरांमध्ये एकतेची भावना अधिक दृढ झाली, हे वास्तव नाकारता येणार नाही.
आज नगरपालिकेच्या पातळीवर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. रस्ते, पाणी, स्वच्छता, युवकांचे प्रश्न आणि सामाजिक समतोल या बाबी नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याशी थेट जोडलेल्या आहेत. अशा वेळी जनतेला केवळ आश्वासनं देणारा नव्हे, तर त्यांच्या अडचणी ऐकून घेणारा आणि त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणारा नगरसेवक हवा आहे. याच अपेक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मधील अनेक नागरिक ऋषिकेश विलासराव कदम यांच्याकडे आशेने पाहत आहेत.
समाजकार्यातून उभं राहिलेलं, माणसांशी भावनिक नातं जपणारं, सामाजिक चळवळींना दिशा देणारं आणि तरुणांच्या भविष्यासाठी ठाम भूमिका घेणारं व्यक्तिमत्त्व नगरसेवकपदी यावं, हीच भावना सध्या प्रभागात व्यक्त होताना दिसत आहे. त्यामुळे ऋषिकेश कदम यांना नगरसेवक म्हणून निवडून आणण्याची जबाबदारी प्रभाग क्रमांक 15 ची जनता पार पाडेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
निवडणूक ही शेवटी जनतेचा निर्णय असतो. मात्र समाजाशी प्रामाणिक नातं जपणाऱ्या, प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या आणि कृतीतून विश्वास निर्माण करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी जनता उभी राहते, हा आजवरचा अनुभव आहे. आणि त्याच अनुभवाच्या आधारे, प्रभाग क्रमांक 15 मध्ये ऋषिकेश विलासराव कदम यांचं नाव विश्वासाचं प्रतीक ठरत चाललं आहे.




