देशप्रशासनमहाराष्ट्रराजकारण

डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांची लातूरमध्ये सोयाबीन संशोधन केंद्रासाठी २५ कोटींच्या विशेष अनुदानाची मागणी

लातूर : लातूर जिल्ह्यात सोयाबीन संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष अनुदान मंजूर करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्री Shivraj Singh Chouhan यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्रात गेल्या ३० ते ४० वर्षांत सोयाबीनची शेती मोठ्या प्रमाणावर वाढली असून सध्या ती खरीप हंगामातील प्रमुख नगदी पिक बनली आहे. विशेषतः लातूर जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्रफळ लक्षणीय असून येथे सोयाबीन प्रक्रिया उद्योगही मोठ्या प्रमाणावर विकसित झाले आहेत. मात्र, उत्पादनात अपेक्षित वाढ होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

भौगोलिक परिस्थिती, बदलते हवामान, अनियमित पाऊस, जमिनीचा प्रकार तसेच रोग व कीड प्रादुर्भाव या कारणांमुळे उत्पादकतेवर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मराठवाडा व महाराष्ट्रातील विविध भागांच्या स्थानिक हवामानाचा सखोल अभ्यास करून त्या परिस्थितीत अधिक उत्पादन देणाऱ्या व रोगप्रतिकारक जाती विकसित करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये स्वतंत्र सोयाबीन संशोधन केंद्र (Soybean Research Centre) स्थापन करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे. या केंद्रामार्फत सोयाबीन पिकावर संशोधन, उच्च उत्पादक वाणांचा विकास, प्रक्रिया उद्योगासाठी पूरक तंत्रज्ञान निर्मिती तसेच शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या संशोधन केंद्राच्या स्थापनेसाठी सुमारे २५ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असून कृषी विभागामार्फत विशेष अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

हे केंद्र कार्यान्वित झाल्यास महाराष्ट्रातील विशेषतः दुष्काळग्रस्त व अल्पभूधारक शेतकऱ्यांना उत्पादनवाढीचा मोठा फायदा होईल आणि राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल, असा विश्वास डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केला आहे.

लातूरमध्ये प्रस्तावित सोयाबीन संशोधन केंद्रासाठी केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button