प्रतिबंधित गुटखा साठा उघड — एमआयडीसी पोलीसांची छापामार कारवाई, १.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त.

लातूर, दि. ४ मे २०२५ —
शासनाने बंदी घातलेल्या प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा लातूरमध्ये उघडकीस आला असून, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने बार्शी रोडवरील सागर किराणा दुकानावर छापा टाकत १,९७,१९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने गुप्त माहितीच्या आधारे केली. सागर किराणा दुकान,

पाण्याच्या टाकीजवळ, बार्शी रोड येथे छापा टाकला असता दुकानातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा मिळून आला.
याप्रकरणी इरफान हबीब शेख (वय ४१, रा. काझी मोहल्ला, आनंदनगर, लातूर) या इसमाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २७४, २७५, आणि २२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे करत असून, ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
छापामार कारवाईत पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक श्रीकांत मोरे, सफौ भिमराव बेल्लाळे, शिंगाडे, पोलीस अंमलदार भगवत मुळे, बळवंत भोसले, राजाभाऊ मस्के, प्रशांत ओगले, इश्वर तुरे आणि महिला पोलीस अंमलदार पल्लवी शिवणकर सहभागी होते.
गुटख्याच्या वाढत्या गैरव्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.