क्राइमदेशप्रशासनमहाराष्ट्रराजकारण

परळीतील भरदिवसा अपहरण-मारहाण; बीड जिल्ह्यात गुन्हेगारी पुन्हा बळावली.

Beed Parli Crime news:बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीचं उग्र स्वरूप समोर आलं आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या(Santosh Deshmukh Murder Case) निर्घृण हत्येने काही महिन्यांपूर्वी संपूर्ण राज्य हादरलं होतं. मात्र त्या घटनेनंतरही गुन्हेगारीला रोखण्याच्या पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या आश्वासनांना फारसा अर्थ उरलेला दिसत नाही. कारण, परळीमध्ये भरदिवसा एका तरुणाचं अपहरण करून त्याच्यावर लाठ्याकाठ्यांनी अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

शुक्रवार, १६ मे रोजी सायंकाळी चारच्या सुमारास परळी येथील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून शिवराज हनुमान दिवटे या तरुणाचे अपहरण करण्यात आलं. त्यानंतर त्याला थेट टोकवाडी गावातील रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात नेण्यात आलं. तिथं समाधान मुंडे आणि इतर आरोपींनी त्याच्यावर लाठ्याकाठ्यांनी प्राणघातक हल्ला केला. या मारहाणीत शिवराज दिवटे गंभीर जखमी झाला असून, सध्या त्याच्यावर अंबाजोगाईतील स्वराची रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून, नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आठवण ताजी झाली असून, बीड जिल्ह्यात गुन्हेगारी रोखण्याची स्थिती अजूनही धोकादायक आहे, हे अधोरेखित होत आहे. सोशल मीडियावर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत (Navneet Kanwat)यांच्याकडे तात्काळ कठोर कारवाईची मागणी होत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी यापूर्वी “गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही,” असा ठाम इशारा दिला होता. त्यांनी पोलिसांना मोकळीक देण्याची ग्वाहीही दिली होती. मात्र तरीदेखील गुन्हेगारांचा धुडगूस सुरूच आहे. भरदिवसा अपहरण आणि मारहाणीसारखी घटना घडत असेल, तर प्रशासनाची आणि पोलिसांची प्रतिमा मोठ्या संकटात सापडली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई करणार, आरोपी लवकर गजाआड जाणार का आणि जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आता प्रत्यक्ष पावले उचलली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. घटना गंभीर असल्याने पोलीस यंत्रणेची कसोटी लागली असून, जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button