“15 हजार लाच मागणारा अधिकारी रंगेहाथ अटकेत”

लातूर दि /20/05/2025
लातूर जिल्ह्यातील रेणापूर पंचायत समितीत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेला सहायक कार्यक्रम अधिकारी ज्योतिर्लिंग बाबुराव चिखले याला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर यांनी 12 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. तक्रारदाराच्या वडिलांच्या नावाने मौजे चाडगाव येथील शेतामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला होता. सुरुवातीला त्याचे इस्टिमेट चार लाख रुपयांचे होते. मात्र, 1 एप्रिल 2025 पासून मजुरी दर वाढल्याने ते पाच लाख रुपयांवर गेले.
स

दर इस्टिमेट अद्ययावत करून देणे आणि नरेगा साइटवरील चुकीच्या आडनावाची (सोमवंशीऐवजी सूर्यवंशी) दुरुस्ती करण्यासाठी चिखले यांनी तक्रारदाराकडे पंधरा हजार रुपयांची लाच मागितली होती. ही रक्कम लाच म्हणून मागितली जात असल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने 8 मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर येथे तक्रार दाखल केली. 9 आणि 13 मे रोजी पडताळणी करण्यात आली. यावेळी चिखले यांनी तक्रारदाराकडे “आणला का रे पैसे?” असे विचारून, “तुझ्या मनाने देऊन जा” असे सांगत लाच घेण्यास सहमती दर्शवली होती.
त्यावरून 14, 16 आणि 19 मे रोजी सापळा रचण्यात आला. मात्र आरोपी आणि तक्रारदार यांची भेट न झाल्यामुळे कारवाई होऊ शकली नाही. अखेर आज 20 मे रोजी सापळा कारवाई दरम्यान आरोपी चिखले याने तक्रारदाराकडून 12 हजार रुपये लाच रक्कम स्वतः घेतली आणि त्याचवेळी त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. आरोपीच्या अंगझडतीत लाच रक्कमेसह मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून त्याच्या निवासस्थानाची झडती सुरू आहे.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कलम 7 अ नुसार रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीचा मोबाईलही तपासासाठी ताब्यात घेण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री. संतोष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याला पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. संजय तुंगार यांचेही मार्गदर्शन लाभले.