देशप्रशासनमहाराष्ट्रराजकारण

“लोकसभा-विधानसभेचा अभ्यास करून स्थानिक स्वराज्य संस्थांवर विजय मिळवूया: अमित देशमुख”

लातूर | प्रतिनिधी | ६ जून २०२५
काँग्रेस पक्षाने पदाधिकाऱ्यांची नियुक्ती म्हणजे त्यांच्या कर्तृत्वावर ठेवलेला विश्वास असून, हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी पक्षाच्या विचारसरणीचा प्रसार घराघरात करणे ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री व आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी ही फक्त निवडणूक जिंकण्यापुरती मर्यादित नसून, ती ही एक संधी आहे – संघटनात्मक पुनर्रचना, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याची आणि राजकीय जमिनीवर नव्याने पाय रोवण्याची. या पार्श्वभूमीवर लातूर शहर व ग्रामीण काँग्रेसच्या नव्या प्रभाग अध्यक्ष आणि ग्रामअध्यक्षांच्या नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा अभ्यास हा केवळ आकड्यांचा विचार न करता, जनतेच्या मनाचा, त्यांच्या अपेक्षांचा आणि त्यांच्या प्रतिक्रिया यांचा सखोल अभ्यास असला पाहिजे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुका या वेगळ्या स्वरूपाच्या असल्या तरी त्या जिंकण्यासाठी लागणारे तंत्र काही अंशी समान आहे. मागील निवडणुकांतील चुकांचा अभ्यास, मतभेद कसे दूर करता येतील याचा विचार आणि उमेदवार निश्चितीच्या प्रक्रियेत पारदर्शकता यासाठी त्वरित अभ्यासगट स्थापन करून काम सुरू करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

या कार्यक्रमात लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनीदेखील कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी नव्या उमेदीने झोकून देण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्ट केले की, लोकसभेतील यशानंतर आता विधानसभा निवडणुकीतील अपयश स्वीकारून स्थानिक पातळीवर पक्षाची पकड पुन्हा मजबूत करणे गरजेचे आहे. सत्ता नसताना काम करताना येणाऱ्या अडचणींचा त्यांनी उल्लेख करत, “सत्ता खेचून आणा,” असा स्पष्ट संदेश कार्यकर्त्यांना दिला.

नियुक्ती मिळालेल्या प्रभाग व ग्रामअध्यक्षांच्या निवडीबाबत बोलताना आमदार देशमुख यांनी सांगितले की, या फेरबदलामध्ये काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, काही कार्यकर्ते कार्यमुक्त झाले आहेत. काही अनुभवी कार्यकर्त्यांनी आपले स्थान कायम राखले आहे. लातूर जिल्हा हा महाराष्ट्रात असा पहिला जिल्हा आहे जिथे एवढ्या व्यापक प्रमाणावर संघटनात्मक फेरबदल झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

काँग्रेस भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमात माजी जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, डॉ. दीपक सूळ, ॲड. विजय गायकवाड, अभय साळुंके, कैलास कांबळे, समद पटेल, विजय देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या शहरातील १८ प्रभाग अध्यक्ष आणि ग्रामीण भागातील २० ग्रामअध्यक्षांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या नियुक्त्यांमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी संचारली असून, संघटनात्मक बांधणीला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कोळे यांनी केले, तर आभार फारुख शेख यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button