विवेकानंद पोलीस ठाण्याची तत्पर कारवाई, आरोपी अटकेत.


लातूर – ६ जून २०२५:
गेल्या २६ मे रोजी लातूर शहरातील कव्हा रोडवरील गुमस्ता कॉलनीतून अपहरण करण्यात आलेल्या तीन वर्षीय बालकाचा अखेर आज सुखरूप शोध लागला असून, त्याला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या अपहरणप्रकरणी महेश रमाकांत सूर्यवंशी (रा. सिद्धेवर नगर, औसा) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही उल्लेखनीय कारवाई विवेकानंद पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली.
ही घटना २६ मे रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली होती. अज्ञात इसमाने तीन वर्षांच्या बालकाचे अपहरण करून त्याला अज्ञात ठिकाणी नेल्याचे समजताच, विवेकानंद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्रारंभी या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिनगारे यांनी केला, मात्र बदलीनंतर पुढील तपास पोउपनि सचिन रेडेकर यांनी आपल्या हातात घेतला.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, विवेकानंद पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने शास्त्रीय व तांत्रिक पद्धतीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा शोध सुरु केला. गुप्त बातमीदारांचे जाळे उभे करून, मिळालेल्या माहितीच्या आधारे आज ६ जून रोजी सोलापूर येथून आरोपीला अटक करण्यात आली. तर पंढरपूर येथून बालकास स्थानिक पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले.
बालक सुखरूप असून, त्याला त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीने नेमक्या कोणत्या हेतूने अपहरण केले होते याचा तपास पोलीस करत आहेत.
ही संपूर्ण कामगिरी पोउपनि सचिन रेडेकर, मनिष आंधळे व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार खुर्रम काझी, गणेश यादव, यशपाल कांबळे, रवी गोंदकर, राणा देशमुख, संजय बेरळीकर, रमेश नामदास, सारंग लाव्हरे, सचिन राठोड, आनंद हल्लाळे, दीपक बोंदर, संतोष देवडे, गणेश साठे आणि शैलेश सुडे यांनी केली.
पोलीस दलाच्या या वेगवान व काटेकोर तपासामुळे एक बालक आपल्या कुटुंबाच्या कुशीत परतला असून, संपूर्ण लातूर शहरातून या कामगिरीचे कौतुक होत आहे.