एसपी सोमय मुंडे यांची बदली, जयंत मीना लातूरचे नवे पोलिस अधीक्षक.

लातूर –दि 22/05/25
लातूर जिल्ह्यातील पोलिस प्रशासनात मोठा फेरबदल झाला असून पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपआयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी जयंत मीना, दहशतवाद विरोधी पथक (ATS), पुणे येथील पोलिस अधीक्षक, यांची लातूर जिल्ह्याच्या नूतन पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या बदलामुळे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण आहे. गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यात अवैध धंद्यांना पाठीशी घालणे, आणि त्या विरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांवर खोट्या गुन्ह्यांची नोंद करणे अशा प्रकारच्या गंभीर आरोपांनी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
राजकीय वर्तुळात या बदलाला ‘राज ठाकरे इम्पॅक्ट’ म्हणून संबोधले जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडेच राज्यातील पोलीस यंत्रणेमध्ये वाढती ढिलाई आणि राजकीय दबावामुळे सुरू असलेली मनमानी यावर प्रश्न उपस्थित केले होते. त्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील बदल अधिक लक्षवेधी ठरतो आहे.
“अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या यंत्रणेवर कारवाई झाली पाहिजे, आणि ही बदली त्या दिशेने एक पाऊल असावी,” अशी भावना जिल्ह्यातील काही सामाजिक संघटनांनी व्यक्त केली आहे.
लातूरमध्ये मद्यविक्री, गुटखा, मटका, वाळू तस्करी यांसारख्या अवैध व्यवसायांना प्रशासनातूनच मदत मिळत असल्याचे आरोप वेळोवेळी झाले असून, या पार्श्वभूमीवर नवे पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्यासमोर आता जिल्ह्यात कायद्याचा प्रभाव प्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.