हगदळ शिवारात ९ किलो गांजासह एक जण अटकेत.


लातूर, 12 जून 2025 — जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे. अहमदपूर तालुक्यातील हगदळ गावाच्या शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि अहमदपूर पोलिस ठाण्याच्या पथकाने संयुक्त छापामारी करत तब्बल ९ किलो गांजाचे झाड जप्त केले. जप्त केलेल्या गांजाची बाजारभावानुसार किंमत सुमारे १ लाख ३७ हजार ७७५ रुपये इतकी आहे.
ही कारवाई दिनांक ११ जून रोजी रात्री उशिरा पार पडली. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर आणि अहमदपूरचे पोलीस निरीक्षक बिराप्पा भुसनूर यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवण्यात आली. हगदळ शिवारातील एका शेतात छापा टाकून गांजाची झाडे ताब्यात घेण्यात आली.
या प्रकरणात शेतमालक राजू उर्फ देवराव मुंडे, वय ३२, रा. हगदळ, ता. अहमदपूर, जि. लातूर याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा व अहमदपूर पोलिसांचे पथक सक्रिय असून, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव, सहाय्यक फौजदार दिंडगे, तसेच पोलीस अंमलदार तुराब पठाण, चौधरी, कछवे, मदने, केंद्रे, सूर्यवंशी, मुंडे यांनी सहभाग घेतला.
पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, जिल्ह्यातील इतर भागांतही अशा बेकायदेशीर लागवडीबाबत तपासाची व्याप्ती वाढवली जात आहे.