औसा पोलिसांची जलद कारवाई: भिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक.

बेधडक आवाज -(औसा)शहरात एका भिकाऱ्याला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केवळ 24 तासांत अटक केली आहे. ही घटना 4 मार्चच्या मध्यरात्री घडली. औसा शहरातील एका दुकानासमोर झोपलेल्या भिकाऱ्यावर एका अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने औसा आणि नंतर लातूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याने दिलेल्या जबाबावरून 5 मार्च रोजी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे व त्यांच्या पथकाने अत्यंत बारकाईने तपास करून आरोपीचा शोध घेतला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 7 मार्च रोजी योगेश सिद्राम बुट्टे (वय 35, रा. अन्नपूर्णा नगर, औसा) याला अटक केली.
प्राथमिक चौकशीत, भिकाऱ्याने आरोपीला शिवीगाळ केल्याच्या रागातून त्याने हा अमानुष प्रकार केल्याचे कबूल केले आहे. पोलिसांच्या जलद आणि प्रभावी तपासामुळे अवघ्या 24 तासांत आरोपीला अटक करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, सहाय्यक फौजदार कांबळे, पोलीस अंमलदार गुट्टे, रतन शेख, समीर शेख, मुबाज सय्यद, बालाजी चव्हाण, पडीले, गोमारे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
औसा पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.