उमेश कांबळे यांचा निवडणूक आयोगाकडे तक्रार –”दिवाळी पहाट” कार्यक्रमाच्या आयोजनावर आक्षेप.

जिल्हा प्रतिनिधी,(बेधडक आवाज)-लातूर, 01.11.2024 लातूर शहरातील विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार श्री.अमित देशमुख यांच्याविरोधात निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन आणि लोकप्रतिनिधी अधिनियम, 1951 च्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपासह उमेश कांबळे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी, निवडणूक अधिकारी आणि निवडणूक निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.कांबळे यांच्या मते, लातूरमधील विलास को-ऑपरेटिव्ह बँकेकडून आयोजित “दिवाळी पहाट” कार्यक्रमामध्ये काँग्रेस पक्षाचा अप्रत्यक्षपणे प्रचार होत आहे आणि यामुळे मतदारांवर अनैतिकरीत्या प्रभाव पडण्याचा धोका आहे.
तक्रारीतील मुख्य मुद्दे:
आर्थिक संबंध आणि संभाव्य प्रभाव:
श्री. कांबळे यांनी श्री. अमित देशमुख यांच्यावर आरोप केला आहे की, त्यांनी विलास को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात ठेवी व शेअर्स ठेवले आहेत, ज्यामुळे बँकेवरील त्यांचा प्रभाव आहे. बँकेच्या संचालक मंडळातील अनेक प्रमुख सदस्य आणि पदाधिकारी हे काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्याचे नमूद करून श्री. कांबळे यांनी याचा राजकीय फायदा घेतला जात असल्याचा आरोप केला आहे. यामुळे कार्यक्रमाचा उद्देश केवळ सांस्कृतिक नसून, मतदारांवर काँग्रेस पक्षासाठी दबाव आणणे असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
“दिवाळी पहाट” कार्यक्रम आणि जाहिरात फलक:

बँकेकडून “दिवाळी पहाट” हा कार्यक्रम २ नोव्हेंबर २०२४ रोजी लातूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या जाहिराती शहरभर मोठ्या प्रमाणात लावण्यात आल्या असून काही होर्डिंग्ज काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी प्रसिद्ध केल्याचे दिसत आहे. विशेषतः शिवाजी चौकासारख्या ठिकाणी काँग्रेसच्या इतर फलकांसोबत हे होर्डिंग्ज लागले आहेत, त्यामुळे कार्यक्रमाला काँग्रेसचे अप्रत्यक्ष समर्थन मिळत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
आचारसंहितेचे उल्लंघन:
निवडणूक आचारसंहितेनुसार, कोणत्याही धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करणे हा आचारसंहितेचा स्पष्ट भंग आहे. तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की, लोकप्रतिनिधी अधिनियमाच्या कलम 123 नुसार, मतदारांवर आर्थिक किंवा इतर प्रकारे दबाव आणणे हे भ्रष्टाचारी स्वरूपाचे असल्याचे मानले जाते.
निवडणूक खर्चाच्या माहितीत त्रुटी:
निवडणूक खर्चाच्या पारदर्शकतेसाठी निवडणूक खर्चात सर्व खर्चाचा अहवाल देणे आवश्यक आहे. तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, श्री. देशमुख यांनी “दिवाळी पहाट” कार्यक्रमातील खर्च निवडणूक खर्च अहवालात समाविष्ट केला नाही. हे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे सांगण्यात आले आहे.
सार्वजनिक संसाधनांचा संभाव्य गैरवापर:
विलास को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सार्वजनिक निधीचा वापर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आणि अप्रत्यक्ष राजकीय प्रचारासाठी होणे हा सामान्य नागरिकांच्या हिताविरुद्ध आहे, असा आरोप श्री. कांबळे यांनी केला आहे.
मागण्या:
तक्रारीत श्री. उमेश कांबळे यांनी पुढील मागण्या केल्या आहेत:
“दिवाळी पहाट” कार्यक्रम रद्द करावा.
कार्यक्रमाच्या सर्व जाहिराती आणि फलक तातडीने हटवावेत.श्री.देशमुख यांच्या निवडणूक खर्चाचा सखोल तपास करण्यात यावा.या प्रकाराला आळा घालण्यासाठी विलास को-ऑपरेटिव्ह बँक आणि काँग्रेस पक्षाला पुढील कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई करावी.उमेश कांबळे यांनी आपल्या तक्रारीत असा विश्वास व्यक्त केला आहे की,निवडणूक आयोगाच्या तात्काळ आणि कठोर कारवाईमुळे या प्रकाराला थांबवण्यात येईल आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता कायम राहील.