संत तुकाराम महाराजांचे ११वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी जिवन संपवलं – देहूनगरीत शोककळा.

Bedhadak awaj देहू (पुणे): संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण देहूनगरी शोकसागरात बुडाली आहे. मंगळवारी रात्री त्यांनी आपल्या निवासस्थानी गळफास घेऊन जीवन संपवले. आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
शिरीष महाराज मोरे हे प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमातून उदरनिर्वाह करत होते. त्याचबरोबर त्यांनी निगडी येथे इडली उपहारगृह सुरू केले होते, मात्र त्यातून त्यांना समाधानकारक उत्पन्न मिळत नव्हते. काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा झाला होता आणि पुढील महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. मात्र, या सगळ्याच्या आधीच त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.बुधवारी सकाळी बराच वेळ दरवाजा न उघडल्याने नातेवाईकांनी तोडून पाहिले असता, त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात आर्थिक अडचणींमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले असून, त्यांनी सुसाइड नोटदेखील लिहून ठेवली आहे.
शिरीष महाराज मोरे यांच्या दुर्दैवी निधनाने देहूगावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे.