बीडमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला, दोन आरोपींना कर्नाटकमधून अटक.

Bedhadak awaj -(बीड) जिल्ह्यातील केज तालुक्यात एका तरुणावर निघृण हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशोक मोहिते या तरुणाला दोन जणांनी बेदम मारहाण केली. या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. अखेर पोलिसांनी त्यांचा शोध घेत कर्नाटकमधून त्यांना अटक केली आहे.
अशोक मोहिते हे होमगार्डमध्ये कार्यरत असून, त्यांच्यावर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असून, तब्बल आठ टाके पडले आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
या हल्ल्यामागील कारण हे तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडच्या व्हिडीओजशी जोडले जात आहे. अशोक मोहिते हे ते व्हिडीओ पाहत असल्याचे लक्षात आल्यानंतर, वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी त्यांना निघृण मारहाण केली. हल्ल्यानंतर हे दोघे फरार झाले होते.पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अखेर कर्नाटकमधून दोघांना अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी काही महत्त्वाचे दुवे समोर येण्याची शक्यता असून, पोलिस तपास सुरू आहे.