धूम्रपान न करणाऱ्यांमध्येही वाढतोय फुप्फुसाचा कर्करोग; वायुप्रदूषण कारणीभूत असल्याचा संशोधकांचा दावा.

Bedhadak awaj दि-04/02/2025
फुप्फुसाच्या कर्करोगाला प्रामुख्याने धूम्रपान कारणीभूत मानले जात असले तरी, कधीही सिगारेट न ओढणाऱ्या लोकांमध्येही हा कर्करोग झपाट्याने वाढत असल्याचे धक्कादायक निष्कर्ष एका नवीन अभ्यासातून समोर आले आहेत. मंगळवारी जागतिक कर्करोग दिनानिमित्त ‘द लॅन्सेट रेस्पिरेटरी मेडिसिन जर्नल’मध्ये हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’ (IARC) च्या संशोधकांनी ‘ग्लोबल कॅन्सर ऑब्झर्व्हेटरी २०२२’ मधील डेटाचा अभ्यास केला. यात ‘एडेनोकार्सिनोमा’, ‘स्क्वॅमस सेल कार्सिनोमा’, ‘स्मॉल अँड लार्ज सेल कार्सिनोमा’ या चार प्रकारांसाठी वेगवेगळ्या देशांतील फुप्फुसाच्या कर्करोगाच्या घटनांचे विश्लेषण करण्यात आले.
संशोधनानुसार, कधीही धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींमध्ये आढळणाऱ्या फुप्फुसाच्या कर्करोगाच्या ५३ ते ७० टक्के प्रकरणे ‘एडेनोकार्सिनोमा’शी संबंधित आहेत. एडेनोकार्सिनोमा हा कर्करोग श्लेष्मा आणि पाचक ग्रंथींमध्ये सुरू होतो आणि तो पुरुष व महिलांमध्ये समान प्रमाणात आढळतो. विशेष म्हणजे, धूम्रपान करणाऱ्यांमध्ये इतर प्रकारच्या कर्करोगांच्या तुलनेत एडेनोकार्सिनोमा होण्याची शक्यता तुलनेने कमी असल्याचेही अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
जागतिक स्तरावर धूम्रपानाचे प्रमाण घटत असले तरी, कधीही सिगारेट न ओढणाऱ्या लोकांमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. हा कर्करोग प्रामुख्याने महिला आणि आशियाई वंशाच्या लोकांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. विशेष म्हणजे, कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या यादीत फुप्फुसाचा कर्करोग पहिल्या क्रमांकावर आहे, तर धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये आढळणारा फुप्फुसाचा कर्करोग मृत्यूचे पाचवे प्रमुख कारण ठरत आहे.
संशोधकांच्या मते, वाढत्या प्रदूषणामुळे या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांनी वायुप्रदूषणावर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.