इंस्टाग्रामवर “क्वीन रील स्टार”… प्रत्यक्षात कॉपर वायर चोरीत अटक ; ३२ हजार फॉलोअर्स असलेली तरुणी LCB च्या जाळ्यात..

लातूर | प्रतिनिधी
सोशल मीडियावर “क्वीन रील स्टार” नावाने रील्स बनवत हजारो फॉलोअर्स मिळवणारी तरुणी आता थेट पोलीसांच्या ताब्यात गेल्याने लातूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. इंस्टाग्रामवर ग्लॅमर आणि प्रसिद्धीचे प्रदर्शन करणाऱ्या या तरुणीवर कॉपर वायर चोरीसारख्या गंभीर गुन्ह्याचा आरोप असून, स्थानिक गुन्हे शाखेने तिच्याकडून तब्बल ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.लातूर जिल्ह्यात वाढत्या मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष मोहिमा राबविण्यात येत आहेत. अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.दि. २७ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लातूर शहर परिसरात संशयितांची पडताळणी करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, यशवंत शाळेजवळ एक महिला चोरीच्या कॉपर वायर विक्रीतून मिळालेली रक्कम घेऊन संशयास्पदरीत्या थांबली आहे. तसेच ती वारंवार कॉपर वायर चोरी करून भंगार विक्रेत्यांना विक्री करत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली.या माहितीनंतर पोलिसांनी सापळा रचून संबंधित महिलेला ताब्यात घेतले. चौकशीत तिने आपले नाव प्रिया जितेंद्र कांबळे (वय १९, रा. विलासनगर, लातूर) असे सांगितले. तिच्या ताब्यातील लाल रंगाच्या पिशवीतून रोख रक्कम आढळून आली. पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता, प्रकाश नगर परिसरातील बुद्धविहारासमोरील सुरू असलेल्या बांधकाम ठिकाणावरून लाईटचे कॉपर वायर चोरी केल्याची कबुली तिने दिली.चोरी केलेले कॉपर वायर फिरत्या भंगार विक्रेत्यांना विकून त्यातून मिळालेली रक्कम स्वतःजवळ ठेवल्याचेही तिने सांगितले. पोलिसांनी अभिलेख तपासले असता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरनं २७२/२०२६ अन्वये कॉपर वायर चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आरोपी महिलेकडून चोरीच्या वायर विक्रीतून मिळालेले ४१ हजार रुपये जप्त करण्यात आले.विशेष म्हणजे, पोलिस तपासात हीच तरुणी इंस्टाग्रामवर “क्वीन रील स्टार” नावाने प्रसिद्ध असल्याचे समोर आले. तिचे जवळपास ३२ हजार फॉलोअर्स असल्याची माहिती मिळताच सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. “रील्सच्या दुनियेत प्रसिद्धी… आणि वास्तवात गुन्हेगारी?” असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.ही कारवाई पोउपनि प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, पाराजी पुठ्ठेवाड, तुळशीराम बरुरे तसेच महिला पोलीस अंमलदार मदने यांच्या पथकाने केली. आरोपी महिलेला पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.




