किरकोळ कारणावरून खून; भिकाऱ्याला काही तासांत अटक.

Bedhadak awaj लातूर शहरात तंबाखूवरून झालेल्या किरकोळ वादातून एका भिक्षेकऱ्याने दुसऱ्या भिक्षेकऱ्याचा दगडाने ठेचून खून केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे काही तासांतच आरोपीला अटक केली आहे.

13 ते 14 मार्चच्या मध्यरात्री शिवाजीनगर येथील चहाटपरीसमोर फुटपाथवर झोपलेल्या प्रकाश लिंबाजी भडके (वय 58, रा. खाडगाव रोड, लातूर) याचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून खून केला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे

शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांत आरोपी देविदास शेषेराव सोनकांबळे (वय 54, रा. खाडगाव रोड, लातूर) याला 14 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता क्रीडासंकुल गेटजवळून अटक करण्यात आली.
आरोपी हा दिवसभर भिक्षा मागून गुजराण करतो. तंबाखू घेण्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून आरोपीने मध्यरात्री भडके यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केल्याची कबुली त्याने दिली.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले आणि त्यांच्या पथकाने केली. आरोपीला पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलीस सहाय्यक निरीक्षक चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.