“फडणवीसांची ‘संस्कार संस्कृती’ ही केवळ नौटंकी!” — राऊत

Bedhadak awaj 04/06/2025
गिरीश महाजन यांच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयात ठेकेदार थेट मंत्रालयात बसून फायली मंजूर करतो आणि त्या ठेकेदाराचा फोन येत नाही तोपर्यंत महाजन कोणत्याही फाईलवर सही करत नाहीत, असा गंभीर आरोप समोर आला आहे. अभिषेक कौल नावाचा हा ठेकेदार मंत्रालयात बसतो, आणि निर्णय प्रक्रियेवर त्याचा सरळ हस्तक्षेप असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हे सरकार आता मंत्र्यांनी नव्हे तर दलालांनी चालवायचे ठरवले आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गिरीश महाजनांसारख्या व्यक्तींमुळे देवेंद्र फडणवीस यांची ‘संस्कार संस्कृती’ ही केवळ एक विनोद ठरू लागली आहे. फडणवीसांनी अशा लोकांना सोबत ठेवणे ही त्यांचीच मानसिकता स्पष्ट करणारी बाब आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
गिरीश महाजन यांच्यावर यापूर्वीही अनेक आरोप झाले आहेत. निवडणुकीत मद्यवाटपाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते, पिस्तूल घेऊन डान्स केल्याचा व्हिडीओ समोर आला होता, काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींशी त्यांचे कथित संबंध होते, तसेच सावकारीप्रकरणी काही तक्रारीही समोर आल्या होत्या. त्यामुळे महाजन यांची कार्यशैली आणि सार्वजनिक प्रतिमा या आधीच वादग्रस्त बनली आहे. त्यात आता मंत्रालयात थेट ठेकेदारांच्या माध्यमातून फायली मंजूर केल्या जात असल्याचा आरोप ही गंभीर बाब मानली जात आहे.
या आरोपांवर महाजन किंवा त्यांच्या कार्यालयाकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र विरोधकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून, यामुळे महाजन यांचे मंत्रालय कसे चालते, यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जर खरोखर मंत्रालयात निर्णय घेण्याचे अधिकार एका खासगी ठेकेदाराच्या हातात गेले असतील, तर ही बाब लोकशाही व्यवस्थेसाठी धोकादायक असून याची दखल राज्य सरकारने घ्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.