3 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त.

लातूर | bedhadak awaj दि|04/06/2025(प्रतिनिधी)
औसा तालुक्यातील इंदिरानगर परिसरात प्रतिबंधित चंदन लाकडाची चोरटी साठवणूक करून विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या तस्करांवर पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांच्या विशेष पथकाने छापा टाकत 3 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईत 30 किलो चंदन लाकूड, चार मोटरसायकली आणि वजन काटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन आरोपींना अटक तर एक आरोपी फरार झाला आहे.
ही कारवाई दि. 3 जून 2025 रोजी पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी विशेष पथक तयार केले असून, त्याचाच एक भाग म्हणून ही छापेमारी करण्यात आली.

इंदिरानगर परिसरातील एका पत्र्याच्या शेडवर पोलिसांनी छापा टाकला असता, तिथे चंदनाच्या साल काढून गाभा ठेवण्यात आलेला आढळून आला. घटनास्थळी चौघेजण आढळले, मात्र पोलिसांची चाहूल लागताच एकजण पळून गेला. ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या नावांची नोंद पुढीलप्रमाणे आहे:
- सुरेश बाबुराव जाधव (वय 40), रा. निलंगा
- जनार्दन रावसाहेब पवार (वय 40), रा. बुजुर्कवाडी, ता. निलंगा
- सूर्यकांत जाधव (वय 52), रा. बुजुर्कवाडी, ता. निलंगा
- बालाजी विनायक व्होनताळे, रा. इंदिरानगर, औसा (फरार)
या प्रकरणी पोलीस स्टेशन औसा येथे भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41, 42, महाराष्ट्र वृक्ष तोड अधिनियम 2004 चे कलम 4 आणि भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2), 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस अमलदार रामहरी भोसले, गुंडरे आणि चालक पोलीस अमलदार दीपक वैष्णव यांनी ही कारवाई केली.