लातूर जिल्ह्यातील आजवरची सर्वात मोठी कारवाई;

लातूर (14 मे 2025) — महाराष्ट्रात गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा असताना, कतलीसाठी नेले जात असलेले 31 खिल्लारी जातीचे उंच प्रतीचे गोवंश आणि 40 फूट लांबीचा कंटेनर ट्रक लातूरमधील सतर्क गोरक्षकांच्या मदतीने रेणापूर पोलिसांनी पकडला. ही लातूर जिल्ह्यातील आजवरची सर्वात मोठी गोवंश तस्करीविरोधातील कारवाई ठरली आहे.
ही कारवाई 13 मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली. डायल 112 वर आदर्श जैन या नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार, रेणापूर–आष्टामोड रस्त्यावरील सेवादासनगर तांड्याजवळ एक कंटेनर गोवंशांची अवैध वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. ही माहिती मिळताच पोलीस शिपाई नितीन भताने आणि चालक पोह. बनसोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. गोरक्षकांनी थांबवून ठेवलेला केए-54-7728 क्रमांकाचा ट्रक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले की, सदर कंटेनरमध्ये पांढरे, काळे व जांभळ्या रंगाचे एकूण 31 मोठ्या आकाराचे बैल अत्यंत अमानुष पद्धतीने दाटीवाटीने बांधलेले होते. या गोवंशांची ने-आण करणारे चालक नाजीम खान अब्दुल अजीज (रा. म्हैसुर, कर्नाटक) याने बैल नेकनूर येथून नळेगाव येथे बाजारात नेत असल्याचे सांगितले. यामागे कृष्णा रामभाऊ शिंदे व सय्यद मिस्कीन सय्यद साबेर (दोघे रा. नेकनूर, बिड) यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.
गोरक्षक संघटनांकडून सांगण्यात येत आहे की हे सर्व खिल्लारी जातीचे एक नंबर क्वालिटीचे गोवंश होते, जे थेट हैद्राबादमार्गे केरळच्या स्लॉटर हाऊसकडे कतलीसाठी रवाना होत होते. त्यामुळे FIR मध्ये दाखवलेली जनावरांची किंमत प्रत्यक्ष बाजारभावापेक्षा खूपच कमी असल्याची माहितीही समोर आली आहे.

या कारवाईबाबत पोलीसांनी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1)(घ) आणि मोटार वाहन कायदा कलम 66(1)/192 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, महाराष्ट्र गोवंश हत्या बंदी कायद्यानुसार कलम 5(अ)(ह) अंतर्गत गुन्हा दाखल न केल्याबाबत गोरक्षकांनी प्रश्न उपस्थित केला असून संबंधित कलम लावण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
ही यशस्वी कारवाई झाल्यामुळे लातूर जिल्ह्यातील गोरक्षक कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विशेषतः पोलीस अधीक्षक सोमयाजी मुढे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर रेड्डी, आणि रेणापूरचे पोलीस निरीक्षक निकम यांचे कौतुक होत आहे.
गोरक्षकांची तत्परता आणि पोलिसांची जलद कारवाई यामुळे संभाव्य मोठा जीवितहानीचा प्रकार टळला असून, जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिक आणि पोलीस यांचं समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचं पुन्हा सिद्ध झालं आहे.